अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवडची ऐतिहासिक घटमांडणी…
बुलडाणा दि १९ : देशातील पीक परिस्थिती, पावसाचा अंदाज त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवडची घटमांडणी यावर्षी १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आली आहे.
तर या घटमांडणीचे भाकीत उद्या २० एप्रिलला पहाटे वर्तविण्यात येणार असून या वर्षीच्या भाकीताकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. दरवर्षीचे पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीवर येणारी संकटे, परकीय शत्रू पासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवड मांडणीच्या भाकिताकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते.
बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवड या गावी ऐतिहासिक घटमांडणीची ही परंपरा सुमारे साडे तीनशे वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. राज्यातील बहुतांश भागात भेंडवळच्या घट मांडणीनुसार खरीप व रब्बी पिकांची पेरणी केल्या जाते.
आजच्या आधुनिक काळातही मांडणीतील भाकीत बऱ्याच अंशी खरे ठरत असल्याने विदर्भासह राज्यातील शेतकरी बांधव भेंडवळच्या या घट मांडणीकडे मोठ्या अपेक्षेने पाहतात उद्या २० एप्रिल च्या पहाटे या घट मांडणी चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्रभरातून शेतकरी बांधव भेंडवळ परिसरात वास्तव्यास आलेले आहेत याला वैज्ञानिक आधार नसला तरीही दरवर्षीप्रमाणे याच भेंडवळच्या घट मांडणीवर विदर्भातील शेतकरी अतिशय निष्ठेने विश्वास ठेवून आपले वर्षभरातील पीक पेरणीची नियोजन करत असतात त्यामुळे उद्या पहाटे होणाऱ्या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.ML/ML/MS