#बिगर- बँकिंग वित्तीय संस्थांना कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ

 #बिगर- बँकिंग वित्तीय संस्थांना कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना काळात मोठी आव्हाने असूनही केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देशातील बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) प्रगती करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचा परिणाम दिसून आलेला नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेचा हस्तक्षेप असूनही बँका या एनबीएफसीवर विश्वास ठेवू शकलेल्या नाहित.
वास्तविक, 2018-2019 या आर्थिक वर्षात देशातील सर्वात मोठ्या एनबीएफसींपैकी एक, आयएल अँड एफएफएस मध्ये निर्माण झालेल्या वित्तीय संकटानंतर बँका या क्षेत्राला कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यानंतर काही महिन्यांतच, डीएचएफएल आणि रिलायन्स फायनान्स सारख्या प्रस्थापित एनबीएफसी मध्ये आलेल्या आर्थिक संकटानंतर उर्वरित एनबीएफसींना देखील निधी देण्यासाठी बँकांनी हात आखडता घ्यायला सुरुवात केली आहे.
बँकांची ही द्विधा मन:स्थिती अद्याप संपलेली नाही. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये एनबीएफसीद्वारे वितरित कर्जाची गती 17.8 वरून कमी होऊन 1.9 टक्क्यांवर आली आहे. तर या काळात बँकांनी दिलेल्या कर्जाची गती 13.4 टक्क्यांवरुन कमी होऊन 6.1 टक्क्यांवर आली आहे. काही दिवसांपूर्वी वित्तीय संस्थांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत एनबीएफसीच्या प्रतिनिधींनी ही समस्या उपस्थित केली. त्यांनी सांगितले की एनबीएफसीच्या संपूर्ण सक्रिय सहभागाशिवाय देशातील मोठ्या क्षेत्राला कर्ज देण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही.
बैठकीत 2018 सालातील उदाहरणही देण्यात आले जेव्हा इतर बँकांद्वारे कर्ज वितरणाची गती 10.2 टक्के होती आणि एनबीएफसीने 32.8 टक्के अधिक कर्ज दिले होते. अर्थ मंत्रालयाला असेही सांगण्यात आले आहे की जर एनबीएफसीमध्ये भांडवल पुरवठा प्रवाह सुरळीत न झाल्यास पुढील काही महिन्यांत क्षेत्रातील अनेक लहान कंपन्या बंद करण्याची वेळ येईल. फिच या पतमानांकन संस्थेनेही ताज्या अहवालात म्हटले आहे की कोरोना परिणामातून भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सुधारत आहे. परंतु एनबीएफसी हा एक असा वर्ग आहे ज्याची स्थिती सुधारण्याची शक्यता दिसत नाही. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि बांधकाम यासारख्या प्रमुख क्षेत्रांना कर्ज देणार्‍या एनबीएफसींसाठी तर परिस्थिती अधिक कठीण दिसत आहे.
मात्र वैयक्तिक कर्ज किंवा घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज देणार्‍या एनबीएफसींची परिस्थिती सुधारेल. गृह कर्ज आणि सोने कर्ज देणार्‍या एनबीएफसींची परिस्थितीही मागणीत सुधारणा झाल्यामुळे चांगली होईल. कर्जाचे दर कमी करण्याच्या सरकारच्या सर्व उपायांचा परिणाम या क्षेत्रातील एनबीएफसींवर होईल.
Tag-Banks/NBFC/Loan
PL/KA/PL/11 JAN 2021

mmc

Related post