कामा रुग्णालयात सुरु झाला आयुर्वेदिक बाह्यरुग्ण विभाग

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना काळातील उपचारा दरम्यान आयुर्वेदाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते. त्यानंतर देशातील प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये आयुर्वेदाचा बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात येत आहे. मुंबईतील प्रसिद्ध कामा रुग्णालयामध्ये आयुर्वेदिक बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, रुग्णालयातील हा विभाग नुकताच सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कामा रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना आता आयुर्वेदिक उपचाराचा पर्याय उपलब्ध झाला आहे. आयुर्वेदिक बाह्यरुग्ण विभागाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या विभागात एक डॉक्टर, परिचारिका आणि कक्षसेवक यांची नियुक्ती करण्यात आली असून, सोमवार ते शुक्रवार सलग सहा दिवस हा विभाग सुरू आहे. या विभागात सध्या दररोज २० ते २५ रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मागील काही दिवसांमध्ये या बाह्यरुग्ण विभागाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कामा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या बाह्यरुग्ण विभागात थायरॉईड, वजन कमी करणे, अनियमित मासिक पाळी, पांढरा स्त्राव जाणे, रक्तदाब, मधुमेह, बद्धकोष्ठता, खोकला, बुरशीजन्य संसर्ग, संधिवात, दमा, केस गळणे, मूळव्याध, डिसमेनोरिया आदी आजारांवर उपचार करण्यात येत आहेत.
आयुर्वेदिक औषधे निसर्गातील घटकांपासून बनविलेली असल्याने ती सुरक्षित असतात, तसेच त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. कामा रुग्णालयात सुरू केलेल्या आयुर्वेदिक बाह्यरुग्ण विभागामध्ये आहारावर भर देण्याबरोबरच, मसाज, ध्यान, श्वासोच्छवासाचे व्यायाम, योग आणि पंचकर्म आदी उपचार पद्धतींद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.
SL/ML/SL
6 June 2024