आंतरराष्ट्रीय नेमबाज नेहा सापते हिचा बाळासाहेब भवन येथे केला सत्कार

मुंबई, दि 6
बिहारमध्ये दिनांक ०४ ते १५ मे २०२५ दरम्यान पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण विजेतेपद पटकावले आणि सुवर्ण करंडक आपल्या नावावर केला.
या स्पर्धेत कुमारी नेहा मिलिंद साप्ते यांनी आपली उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट घडवली. त्यांच्या या यशस्वी योगदानाबद्दल शिवसेना गृहसंकुल विभागातर्फे त्यांचा बाळासाहेब भवन येथे सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभ प्रसंगी शिवसेना सचिव मा. श्री. संजय मोरे, ज्येष्ठ नेते मा. श्री. पांडुरंग पाटील, तसेच राज्य समन्वयक श्री. हेमंत खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नेहा यांचे पालकही उपस्थित होते.
कुमारी नेहा मिलिंद साप्ते या आंतरराष्ट्रीय नेमबाज व क्रीडा अधिकारी असून, त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नेमबाजी संघाच्या प्रशिक्षक म्हणून यशस्वी प्रतिनिधित्व केले.
याचबरोबर त्या १९ ते २४ मे २०२५ दरम्यान दमण-दिव येथे होणाऱ्या पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स मध्ये महाराष्ट्र जलतरण संघाच्या व्यवस्थापक म्हणून सहभागी होत आहेत.
त्याआधी, मार्च २०२५ मध्ये दिल्ली येथे पार पडलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या पॅरा-शूटिंग संघाचे प्रशिक्षक म्हणून नेतृत्व केले होते आणि या संघाने एकूण तिसरे स्थान मिळवून कांस्य करंडक जिंकला होता.
श्री. हेमंत खांडेकर यांनी नेहा यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.