अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे होणार महाग

मुंबई,दि. १७ : अमेरिकेत नोकरी, व्यवसायानिमित्त राहून भारतात नियमित पैसे पाठवणाऱ्या भारतीयांना यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. ट्रम्प प्रशासनाने या मायदेशी पाठवण्यात येणाऱ्या पैशावर पाच टक्के कर लावण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या वर्षी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांकडून पाठवण्यात येणाऱ्या रकमेसाठी १.६ अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम अतिरिक्त मोजावी लागणार आहे. अशा प्रकारे पाठवण्यात येणाऱ्या रकमेवर पाच टक्के कर लागल्यास अमेरिकेच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे.
भारतात पाठवण्यात येणाऱ्या रकमेवर कर लावण्याचे विधेयक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्राधान्य असलेले विधेयक आहे. केवळ पाच टक्के कर आकारल्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या ग्रीनकार्ड धारक व एच१बी व्हिसाधारक अशा चार कोटींहून अधिक भारतीयांना याचा फटका बसणार आहे; परंतु हा कर अमेरिकी नागरिकांना लागू होणार नाही.