मराठवाडा साहित्य संमेलन 15-16 फेब्रुवारीला वाळूजमध्ये

छ. संभाजीनगर दि १२ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : 44वे मराठवाडा साहित्य संमेलन 15 , 16 फेब्रुवारी रोजी वाळूज येथे दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या संमेलनात पहिल्यांदाच संविधानावर ग्रंथ म्हणून चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. संविधानावर निवडणुकांदरम्यान झालेल्या उलटसुलट चर्चांमुळे त्याचे मूळ सार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याने हा विषय चर्चासत्रासाठी निवडल्याचे ठाले पाटील यांनी स्पष्ट केले.
15 फेब्रुवारी रोजी संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे आणि मंत्री अमित विलासराव देशमुख हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या संमेलनाध्यक्षपदाचा मान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भीमराव वाघचौरे यांना मिळाला आहे. संमेलनाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी मराठवाडा साहित्य परिषदेने स्वीकारली असून, विविध चर्चासत्रे आणि साहित्यिक कार्यक्रमांसाठी तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.
ML/ML/SL
12 Feb. 2025