बीड सरपंच हत्याकांडांतील सर्व आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाई

बीड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींवर आता अधिक कठोर कारवाई होणार आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणातील सर्वच आरोपींवर हत्येच्या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. त्याची माहिती लवकरच कोर्टाला दिली जाणार आहे. SIT च्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार या सात जणांवर MCOCA लावण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराडवर सध्या आवादा पवनचक्की कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर सध्या MCOCA अंतर्गत कारवाई करण्यात आली नाही.
MCOCA म्हणजेच Maharashtra Control of Organized Crime Act अंतर्गत किमान 5 वर्षांची शिक्षा व 5 लाखांचा दंड होऊ शकतो. जास्तीत जास्त शिक्षा ही गुन्ह्याच्या स्वरुपावरुन ठरत असते. या प्रकरणी आरोपींना जन्मठेप किंवा फाशीही होऊ शकते. MCOCA लागल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही. विशेषतः गुन्ह्याचा तपास होत नाही तोपर्यंत जामीन दिला जात नाही. पुढे देखील आरोपींना जामीन मिळणे कठीण असते.
संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी 6 जणांवर आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे नामक एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा कसून शोध घेतला जात आहे. सीआयडीने या प्रकरणाशी निगडीत असणाऱ्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याला बेड्या ठोकल्या आहेत. वाल्मीक हा मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वास आहे. त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे.
बीडमधील सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रकरणी आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना गरज भासली तर या प्रकरणात मकोका लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात प्रत्यक्ष मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान बीडच्या सर्वपक्षीय नेत्यांनी वाल्मीक कराच्या खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात वाल्मीक कराडवरही या कायद्यांतर्गत कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
SL/ML/SL
11 Jan. 2025