कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या आगीमुळे 13 लाख कोटींचे नुकसान
लॉस एंजेलिस, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस येथे लागलेल्या आगीत सुमारे 13 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अमेरिकेत हवामानाशी संबंधित सेवा पुरवणाऱ्या इक्वेडोर या खासगी कंपनीच्या म्हणण्यानुसार, या आगीमुळे कॅलिफोर्नियाचे एकूण नुकसान 135 अब्ज ते 150 अब्ज अमेरिकन डॉलर्स दरम्यान होईल. आगीत सुमारे 10 हजार इमारती जळून खाक झाल्या आहेत, तर 30 हजार घरांचे नुकसान झाले आहे. सुमारे 50 हजार लोकांना तात्काळ घरे सोडण्यास सांगण्यात आले आहे. 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवारपर्यंत आग आणखी पसरण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 1 लाख लोक विजेशिवाय जगत आहेत.
इतर गोष्टींबरोबरच घरे आणि इतर इमारतींना झालेल्या नुकसानीचाही समावेश नुकसानीच्या मुल्यांकनात करण्यात आला आहे. याशिवाय, मूलभूत पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान आणि त्यांच्या पुनर्बांधणीसाठी दीर्घकालीन खर्चाचाही समावेश आहे. आगीवर अद्याप नियंत्रण मिळालेले नाही, त्यामुळे ही आकडेवारी आणखी वाढणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये लागलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी आग आहे. गेल्या 4 दिवसांपासून धुमसत असलेली आग सुमारे 40 हजार एकर परिसरात पसरली आहे. यामध्ये 29 हजार एकर क्षेत्र पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
SL/ML/SL
10 Jan. 2025