येमेनमध्ये भारतीय नर्सला सुनावण्यात आली फाशीची शिक्षा

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येमेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केरळ येथील परिचारिका निमिषा प्रियाच्या फाशीच्या शिक्षेला मंजुरी दिली आहे. त्यानंतर लगेचच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आज सांगितले की, तिला शक्य ती सर्व मदत केली जात आहे. भारतीय परिचारिकेवर येमेनच्या एका नागरिकाची हत्या केल्याचा आरोप असून आता तिच्या मृत्युदंडाच्या शिक्षेला मंजुरी देण्यात आली आहे. येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद मोहम्मद अल-अलिमी यांनी या शिक्षेची घोषणा केली. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडे येथील ३६ वर्षीय नर्स निमिषा प्रिया २००८ मध्ये तिच्या पालकांना आधार देण्यासाठी येमेनला गेली होती. अनेक रुग्णालयांत काम केल्यानंतर तिने शेवटी स्वतःचे रुग्णालय उघडले. २०१४ मध्ये ती तलाल अब्दो महदीच्या संपर्कात आली आणि तिने तिचे स्वतःचे रुग्णालय उघडले. येमेनमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक कायद्याने स्थानिकांशी भागीदारी करणे अनिवार्य केले आहे, त्यामुळे व्यवसायात तिला तलाल अब्दो महदीची मदत झाली. या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर निमिषाने महदीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली, त्यामुळे त्याला २०१६ मध्ये अटक करण्यात आली. परंतु, त्याची सुटका झाल्यानंतरही तो तिला धमक्या देत राहिला.
मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ते तिची सर्व प्रकारे मदत करतील. पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की, “येमेनमध्ये निमिषा प्रियाला सुनावण्यात आलेल्या शिक्षेची आम्हाला माहिती आहे. आम्हाला समजले आहे की प्रियाचे कुटुंब सध्या मार्ग शोधत आहे. सरकार या प्रकरणात शक्य ती सर्व मदत करत आहे.” निमिषा प्रिया २०१४ मध्ये तिच्या पतीबरोबर येमेनला गेली होती. मात्र, आर्थिक अडचणींमुळे पती आणि मुले भारतात परतले, परंतु निमिषा तिथेच राहिली होती. पती भारतात परतल्यावर प्रियाने पतीचा मित्र तलाल अब्दो महदी याच्याकडे येमेनमध्ये क्लिनिक उघडण्यासाठी मदत मागितली. पुढे दोघांनी व्यवसाय सुरू केला. व्यवसायात वाद निर्माण झाला. तिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्याप्रमाणे, निमिषा तलाल अब्दो महदीच्या जाचाला कंटाळली होती. आता या प्रकरणात भारताला तिची फाशी रोखण्यात यश मिळू शकेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
येमेनी कायद्याने प्रजासत्ताकाचे स्वातंत्र्य, एकता किंवा प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणे, “सशस्त्र दलांना कमकुवत करण्याच्या उद्देशाने कृती करणे, हत्या, अमली पदार्थांची तस्करी, व्यभिचार, प्रौढांमधील सहमतीने समलैंगिक क्रियाकलाप, इस्लाम धर्म सोडणे किंवा त्याचा निषेध करणे आणि वेश्याव्यवसाय करणे, यांसह विविध प्रकारच्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. याच अंतर्गत निमिषा प्रिया हिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. निमिषाच्या आई यांनी खटला लढण्यासाठी तिची मालमत्ता विकली आहे, असे वकील सुभाष चंद्रन यांनी सांगितले. राजकारणी, व्यापारी, कार्यकर्ते आणि निमिषाला न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत.