सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली EVM विरोधातील याचिका
नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात होणाऱ्या प्रत्येक निवडणूकाच्या निकालानंतर पराभूतांकडून EVM बद्दल शंका उपस्थित, करणे बॅलेट पेपर वर निवडणूका घेण्याची मागणी करणे, न्यायालयात याचिका दाखल करणे हे नेहमीचेच समीकरण होऊन गेले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत महायुतीचा प्रचंड संख्याबळाने विजय झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि अन्य काही जणांकडून EVM विरोधात कुरबुरी सुरु झाल्या आहेत. या EVM विरोधात सामाजिक कार्यकर्ते केए पॉल यांनी दाखल केलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
निवडणुकीत बॅलेट पेपर मतदान प्रणाली पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्ते केए पॉल म्हणाले- चंद्राबाबू नायडू आणि वायएस जगनमोहन रेड्डी यांसारख्या नेत्यांनीही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनशी (EVM) छेडछाड करण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्यावर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘जेव्हा चंद्राबाबू नायडू किंवा जगनमोहन रेड्डी निवडणुका हरतात, तेव्हा ते म्हणतात की ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाते आणि जिंकल्यावर ते काहीही बोलत नाहीत.’ ते आम्ही कसे पाहू शकतो, असे खंडपीठाने सांगितले. आम्ही ते नाकारत आहोत. हे सर्व वादविवाद करण्याचे ठिकाण नाही. खंडपीठाने केए पॉल यांना विचारले की, तुम्ही या राजकीय क्षेत्रात का येत आहात? तुमचे कार्यक्षेत्र खूप वेगळे आहे.पॉल एका सामाजिक संस्थेद्वारे अनाथ मुले आणि विधवांच्या पुनर्वसनाचे काम करतात.
याचिकाकर्ते पॉल म्हणाले की, ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते. अमेरिकेसारख्या देशातही मतदान बॅलेट पेपरद्वारेच होते. आपण त्याचे पालन केले पाहिजे. ईव्हीएम लोकशाहीला धोका आहे. एलन मस्क यांनीही ईव्हीएमशी छेडछाड झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. उमेदवार किमान 5 वर्षांसाठी अपात्र असावा याचिकाकर्ते केए पॉल यांनीही खंडपीठाकडून निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी केली. ते म्हणाले की, असे उमेदवार निवडणुकीदरम्यान मतदारांना पैसे, दारू आणि इतर गोष्टींचे आमिष दाखवून दोषी आढळल्यास त्यांना किमान पाच वर्षांसाठी अपात्र ठरवावे.
SL/ML/SL
26 Nov. 2024