सुनिता विल्यम्स यांची तिसऱ्यांदा अवकाश भरारी

 सुनिता विल्यम्स यांची तिसऱ्यांदा अवकाश भरारी

फ्लोरिडा, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी काल ( 5 जून) अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण करत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. अंतराळात चाचणी मोहिमेवर नवीन अंतराळयान उडवणाऱ्या सुनिता विल्यम्स या पहिला महिला ठरल्या आहेत. 58 वर्षांच्या सुनीता विल्यम्स यांनी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर बॅरी “बुच” विल्मोर यांच्यासोबत बोइंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या पहिल्या सदस्य बनून त्यांनी नवा इतिहास रचला आहे.

बोईंग क्रू फ्लाइट टेस्ट (सीएफटी) नावाचे हे मिशन नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामच्या रुपात सुरू करण्यात आले होते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नियमित क्रू फ्लाइटसाठी स्टारलाइनर प्रमाणित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. जर हे मिशन यशस्वी ठरले तर अंतराळवीरांना कक्षेतील लॅबमध्ये घेऊन जाणे आणि तेथून आणणारे स्टारलाइनर हे स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगननंतरचे दुसरे खासगी अवकाशयान ठरेल.

उड्डाण केल्यानंतर स्टारलायनर कॅप्सूल हे सुमारे 26 तासांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी डॉक करण्याचा प्रयत्न करेल. ज्यामध्ये सुनीता विल्यम्स, विल्मोर आणि ऑर्बिटिंग आउटपोस्टसाठी 500 पौंडांपेक्षा अधिक कार्गो असतील. NASA च्या सांगण्यानुसार, सर्व काही ठीक असेल तर स्टारलायनर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उतरेल. त्यानंतर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुच विल्मोर हे हे दोन्ही अंतराळवीर सुमारे एक आठवडा अंतराळात थांबतील. तेथेही ते त्यांचे अभियान सुरू ठेवतील, स्टारलायनर आणि त्याच्या उपप्रणालीची चाचणी या काळात घेण्यात येईल.

2012 साली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासादरम्यान अंतराळाच ट्रायलथॉन पूर्ण करणाऱ्या सुनिता विल्यम्स या पहिल्या व्यक्ती ठरल्या. यूएस नेव्हल अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर 1987 साली त्या यूएस नेव्हीमध्ये सामील झाल्या. 1998 साली NASA द्वारे सुनिता यांची अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर 2006 साली मिशन 14/15 मध्ये आणि 2012 साली त्या अंतराळ मोहिमांमध्ये सुनिता विल्यम्स यांचा महत्वाचा सहभाग होता.

सुनीता विल्यम्स यांच्यासाठी हे उड्डाण त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे, यापूर्वी, सुनीता विल्यम्स यांनी 2006-2007 आणि 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेदरम्यान एसर्वाधिक स्पेसवॉक (7) आणि स्पेसवॉक टाइम (50 तास, 40 मिनिटे) करण्याचा विक्रम रचला होता.

SL/ML/SL

6 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *