Cannes मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

 Cannes मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षीचा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ भारतीय कलाकारांसाठी खूप खास ठरला आहे. श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’ चित्रपटाला रिलीजच्या जवळपास ४८ वर्षांनंतर यंदाच्या ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल स्क्रिनिंग मिळालं. या बरोबरच विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे अनसूया सेनगुप्ता या अभिनेत्राला ‘द शेमलेस’मधील तिच्या अभिनयासाठी अन सर्टन रिगार्ड प्राइज सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टँटिन बोजानोव यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि लिहिलेल्या या चित्रपटात अनसूयाने रेणुका नावाची भूमिका केली होती. अनसूया हा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. यंदाच्या सोहळ्यात अनेक भारतीय सिनेसृष्टीतील कलाकार, एन्फ्लूएन्सर व उद्योजकांनी हजेरी लावली.

अनसूयाने हा पुरस्कार जगभरातील समलैंगिक समुदायाच्या शौर्याला समर्पित केला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात ती म्हणाली, “सर्वांच्या समानतेसाठी लढणासाठी तुम्ही समलिंगी असण्याची गरज नाही. आपण फक्त सभ्य माणूस असायला हवं.”

अनसूया सेनगुप्ता मूळची कोलकाताची आहे. तिने मुंबईत प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केलं आहे. ती सध्या गोव्यात राहते. ‘मसाबा मसाबा’ या नेटफ्लिक्स शोचा सेट तिने डिझाइन केला होता. अनसूयाने जाधवपूर विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. याआधी ‘द कोलकाता’ला दिलेल्या मुलाखतीत अनसूया म्हणाली होती, “कान्समध्ये आमच्या चित्रपटाला नॉमिनेशन मिळाल्याचं कळाल्यावर मी आनंदाने खुर्चीवरून उडी मारली होती!”

दरम्यान लापता लेडीज’मधील मंजू माई या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या छाया कदम यांनीही कान फेस्टीवलला हजेरी लावली. त्यांच्या‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाचं स्क्रीनिंग नुकतंच कान्स सोहळ्यात पार पडलं. या भारतील चित्रपटाला कान्समध्ये भरभरून प्रेम मिळालं. या चित्रपटाला उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आलं.पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या सिनेमात छाया कदम यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. छाया कदम यांनी कान्स सोहळ्याला पहिल्याच दिवशी आईची नथ आणि साडी नेसून उपस्थिती लावल्याची पोस्ट शेअर केली होती. यानंतर चित्रपटाच्या स्क्रीनिंगला देखील त्यांनी खास देसी लूक करून नाकात त्यांच्या आईची नथ परिधान केली होती. त्यांच्या या मराठमोळ्या लूकने कान्समध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

SL/ML/SL

25 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *