लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यातील 58 जागांसाठी 58.82 टक्के मतदान

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातली नागरिक आता लोकसभा निवडणूकीच्या निकालाची म्हणजेच 4 जूनची आतूरतेने वाट पाहत आहेत. एकूण सात टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मतदान कार्यक्रमातील सहाव्या टप्प्यासाठी 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान आज पार पडले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत 58 जागांवर 58.82 टक्के मतदान झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 78.19% आणि सर्वात कमी जम्मू आणि काश्मीरमध्ये 51.41% मतदान झाले. पाच टप्प्यात 429 जागांवर मतदान झाले होते. आज उत्तर प्रदेश (14), हरियाणा (10), बिहार (8), प. बंगाल (8), दिल्ली (7), ओडिशा (6), झारखंड (4), जम्मू काश्मीर (1) या राज्यांमध्ये मतदान पार पडले. आता शेवटच्या आणि सातव्या टप्प्यात लोकसभेच्या 56 जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान आज कडक पोलीस बंदोबस्त असताना देखील पश्चिम बंगालमधील झारग्राममधील भाजप उमेदवार प्रणंत तुडू यांच्यावर हल्ला करण्यात आला. दगड लागल्याने त्याचा सुरक्षा रक्षक जखमी झाला. मतदारांना धमकावल्याची तक्रार मिळाल्यानंतर तुडू गडभेटा येथील एका बूथला भेट देत होते. प्रणत तुडू यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली आहे. भाजपने या हल्ल्यासाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. यावर निवडणूक आयोगाने सांगितले – मतदान सुरू होण्यापूर्वी उमेदवारांचे एजंट स्वाक्षरी करतात. या केंद्रांवर टीएमसी एजंट उपस्थित नव्हते, त्यामुळे फक्त भाजप एजंटांच्या सह्या आहेत.
पश्चिम बंगालमधील तमलूकमध्ये मतदानापूर्वी भाजप कार्यकर्त्यांसोबत झालेल्या झटापटीत TMC समर्थक जखमी झाला. कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश येथून भाजपचे उमेदवार आहेत. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी येथील पीडीपीच्या उमेदवार मेहबूबा मुफ्ती संपावर बसल्या. ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आणि मोबाईलचे आउटगोइंग कॉल ब्लॉक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
५ टप्प्यातील आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर
दरम्यान आज निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत झालेल्या सर्वच मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी जारी केली. तसेच, निवडणूक प्रक्रियेला खराब करण्यासाठी काहीजणांकडून जाणीवपूर्वक चुकीचा समज पसरवला जात आहे. आयोगाच्या अॅपवर सकाळी 9.30 वाजल्यापासून मतदानाची टक्केवारी अपडेट होत असते, असे आयोगाने म्हटले आहे. तसेच, आयोगाकडून प्रेस रिलीज जारी करण्यात आली असून मतदान टक्केवारीत कुठलाही बदल झाला नसल्याचेही सांगितले.
निवडणूक आयोगाकडून जारी केलेली टक्केवारी
पहिला टप्पा – 66.14 टक्के
दुसरी टप्पा – 66.71 टक्के
तिसरा टप्पा – 65.68 टक्के
चौथा टप्पा – 69.16 टक्के
पाचवा टप्पा – 62.20 टक्के
SL/ML/SL
25 May 2024