या राज्यात महागाई दर आहे सर्वांंत कमी

पणजी, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशविदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गोवा राज्यात इंधनाचा आणि मद्याचा दर अन्य राज्यांच्या तुलनेत कमी असतो, हा विशेष नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता पर्यटन हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या गोव्यात महागाई निर्देशांक देशात सर्वात कमी असल्याची बाबही समोर आली आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात गोव्यातील किरकोळ महागाई दर सर्वात कमी म्हणजेच २.७६ टक्के इतका होता. केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. यावेळी संपूर्ण देशाचा किरकोळ महागाई दर ५.१० टक्के इतका होता.
फेब्रुवारी २०२३ मध्ये किरकोळ महागाई दर ६.४४ टक्के होता.बरिझर्व्ह बँकेचे लक्ष्य किरकोळ महागाई दर ४ टक्क्यांपर्यंत आणणे आहे. देशभरात जानेवारी २०२३ च्या तुलनेत फेब्रुवारी २०२४ मध्ये अन्न धान्य, भाज्या यांच्या किमती थोड्या कमी झाल्याने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर कमी झाला आहे. गोव्यानंतर सर्वात कमी महागाई दर सिक्कीमचा आहे.
सिक्कीममध्ये फेब्रुवारी महिन्यात महागाई दर २.९३ टक्के होता.यानंतर नागालँड ३.०९ टक्के, मिझोरम ३.२३ टक्के, मध्य प्रदेश ३.८६ टक्के, उत्तराखंड ३.९५ टक्के या राज्यांचा क्रमांक लागतो. फेब्रुवारी महिन्यात देशात सर्वाधिक १०.९७ टक्के महागाई दर मणिपूरमध्ये होता. त्यानंतर ओडिशा ७.५५ टक्के, तेलंगणा ६.७१ टक्के यांचा समावेश आहे. तर दिल्लीचा महागाई दर २.४२ टक्के होता.
SL/ML/SL