मधुक्रांतीसाठी मुंबईत होतोय मध महोत्सव

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात मधमाशी पालनासाठी मोठा वाव असून मधमाशी पालनामुळे शेती उत्पादनात मोठी वाढ होत असते, त्यातूनच रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी मुंबईत दोन दिवसीय ” मध महोत्सवा ” चे आयोजन करण्यात आले आहे .
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये येत्या १८ आणि १९ जानेवारी असे दोन दिवस हा महोत्सव होणार असून त्यात अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मधमाशा पालनाचे प्रात्यक्षिक , मधांचे विविध प्रकार, मधमाशांच्या वेगवेगळ्या जाती , मधापासून तयार होणारी विविध उत्पादने याठिकाणी असणार आहेत.
१९ तारखेला प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे मधापसून विविध पाक कृतींचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. याशिवाय या दोन दिवसीय महोत्सवात तज्ञ व्यक्ती उपस्थित राहणार असून शेती , मधपालन , मधाची गुणवत्ता, मधाचे गाव निर्मिती , मधुक्रांती साठी उचलण्यात येणारी पावले यावर ते वेगवेगळ्या परिसंवादात मार्गदर्शन करणार आहेत. याठिकाणी मधाची विविध उत्पादने, हनी चॉकलेट , साबण , हेअर ऑईल आदी उत्पादने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक मधाचे गाव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी सोळा कोटींचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पात राखून ठेवण्यात आला आहे. प्रत्येक गावासाठी सुमारे पन्नास लाख रुपयांचा निधी प्राप्त करून देण्यात येणार आहे अशी माहिती या महोत्सवासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी दिली. राज्यभरात मध पालन करणाऱ्या लोकांची कोणतीही माहिती सध्या सरकारकडे नाही ती मिळवण्याची प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून केली जाणार आहे असेही साठे यांनी सांगितले.
ML/KA/SL
16 Jan. 2024