मराठा आरक्षण आंदोलक झाले हिंसक
बीड, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत एका जमावाने बीड मधून कोल्हापूरला निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस वर दगडफेक केली आणि त्यानंतर बस पेटवल्याची घटना बीड तालुक्यातील आहेर वडगाव परिसरात घडली. वेळीच प्रवासी उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना शनिवारी रात्री ९ च्या सुमारास घडली आहे. धावत्या बसवर अचानक दगडफेक झाल्याने चालकाने जागेवरच बस थांबवली. दरम्यान जमावा मधील काहींकडून बसवर पेट्रोल फेकण्यात आले. वेळेचे गांभीर्य लक्षात घेता वाहक चालकांसह संपूर्ण बेचाळीस प्रवासी असलेल्या बसमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला.
काही वेळात दगडफेक थांबल्याने प्रवाशांनी गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत जमावाकडून बस पेटविण्यात आली. जीव मुठीत घेऊन सर्व प्रवासी उतरले आणि सुरक्षित ठिकाणी पळ काढला. बस तीव्र पेटल्या नंतर जमावाने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या अन् फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.
ML/KA/SL
29 Oct. 2023