धाराशिव जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतशिवारांची केली मुख्यमंत्र्यानी पाहणी
धाराशिव, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आमच्या सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे म्हणून आम्ही स्वतः बांधावर शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर भेटायला आलो असून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे, हे सरकार मायबाप शेतकऱ्यांचा आहे ,शेतकरी अन्नदाता आहे, बळीराजा आहे, या बळीराजावरचा संकट दूर होऊ दे असा आपण अयोध्येतील रामाला आणि तुळजाभवानीला साकडं घातला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धाराशिव इथे केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आज धाराशिव जिल्ह्यातील मोरडा आणि वाडी बामणी या शिवारातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री महोदयांनी धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी येथे बाबासाहेब उंबरदंड यांच्या शेतातील कलिंगड, ड्रॅगन फ्रुट पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
तसेच तुळजापूर तालुक्यातील मोरडा येथील नुकसानीची माहिती घेतली. सीताबाई उत्तम सुरवसे आणि उत्तम सुरवसे या दांपत्याच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. दोन एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागायत 8 एप्रिलच्या वादळी पावसाने भुईसपाट झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांपत्याची विचारपूस केली.. त्यांना धीर दिला.
कोणकोणते कर्ज आहेत याची विचारपूस केली…
पूर्णपणे सपाट झालेल्या द्राक्ष बागेत रस्ता काढत आत मध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या बरोबर धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, तुळजापूरचे आ. राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यावेळी उपस्थित होते.
धाराशिव जिल्ह्यात 8 एप्रिल रोजी वादळी अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून अंदाजे प्राथमिक नुकसान 2500 हेक्टर क्षेत्रावर झाले आहे, त्याचे पंचनामे सूरू आहेत. यात 20 मोठी जनावरे, 900 कोंबड्या दगावल्या आहेत.
ML/KA/SL
11 April 2023