निराश शेतकऱ्याने मोफत वाटला चार एकरावरील कांदा
संंगमनेर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अपार कष्ट करूनही शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मनाला पाझर फोडतात. यामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक वेळा उत्पादन खर्च आणि बाजारभाव यांचा मेळ बसत नसल्याने पिकाची काढणी करणेही शक्य होत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील संगमेनर तालुक्यातील पिंपरणे येथील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने हवालदिल होऊन तब्ब्ल चार एकरातील कांदा लोकांना मोफत वाटला आहे.
या शेतकऱ्याची ही ह्रदयद्रावक कहाणी अशी, वसंतराव थोरात यांनी डाळींब पिकातील तेल्या रोगाला कंटाळून ते पिक काढून टाकले आणि ४ एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली. पिक काढणीला येईपर्यंत त्याच्यावर अडीच ते तीन लाख रुपये खर्च झाला. त्यानंतर १० गुंठ्यावरील कांदा काढणी केल्यावर बाजारभाव आणि उत्पादन खर्च यांचा काही ताळमेळ बसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. विक्रीतून येणाऱ्या रक्कतेतून उत्पादन खर्च आणि मेहनीचा मोबदला सोडाच साधा काढणीचा खर्चही निघत नव्हता. घाम गाळून पिकवलेले सोन्यासारखे पिक शेतात कसे सोडणार यामुळे ते खूप निराश झाले.
अखेर या संपूर्ण ४ एकरावरील कांदा पिक त्यांनी लोकांना मोफत काढुन नेण्यास सांगितले. विशेष म्हणजे आजुबाजूच्या गावातील लोकांनी अवघ्या दोन दिवसात शेतातील सर्व कांदा काढून नेऊन शेत रिकामे केले. कांदा पात शेळ्यामेंंढ्यांसाठी मोफत वाटण्यात आली.
बाजारामध्ये कांद्याला बरा भाव असताना देखील शेतकऱ्याला प्रतिकिलोला ४ ते ६ रु. दर मिळतो. यातून काढणी, गाडीभाडे, हमाली, तोलाई असा कोणताच खर्च भरून निघत नाही.
SL/KA/SL
25 Feb. 2023