मशाल चिन्ह तात्पुरते बचावले आणि अपात्रता ही नाही
दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेने बाबत दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर ची सुनावणी दोन आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात होणार असून तोवर ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि अपात्रता यावर दिलासा दिला आहे.
आज ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात यावर आपली बाजू मांडत आयोगाच्या निकालाला सरसकट स्थगिती देण्याची केलेली विनंती मात्र न्यायालयाने अमान्य केली आहे.
आयोगाने दिलेल्या निकालावर आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज शिंदे गटाने कडाडून विरोध केला आणि आधी उच्च न्यायालयात जाण्याची गरज असल्याचे म्हटले मात्र सध्या या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याने मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने पंधरा दिवसांनंतर पुढील सुनावणी घेण्याचं जाहीर करत संबंधितांना नोटीसा बजावल्या आहेत.
युक्तिवाद काय झाला
आयोगाच्या निर्णयानुसार शिंदे गट ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी पक्षादेश जारी करेल आणि २६ फेब्रुवारी नंतर मशाल चिन्ह जाईल अशी भीती ठाकरे गटाच्या वकिलांनी न्यायालयात व्यक्त केली.
यावर न्यायालयाने शिंदे गटाच्या वकिलांना विचारल्यावर पक्षादेश पुढील सुनावणी पर्यंत काढणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले, मग न्यायालयाने चिन्ह ही तोवर राहू देत असे स्पष्ट केले यामुळे संपूर्ण स्थगिती नसली तरी काहीसा दिलासा ठाकरे गटाला मिळाला आहे.
ML/KA/SL
22 Feb. 2023