अमित शहांच्या हस्ते शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण
पुणे,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आंबेगाव येथील साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ‘सरकारवाडा’चे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडगाव, प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला अमित शहा यांनी ‘सरकारवाडा’ला भेट देत, त्याबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी शाल, कवड्यांची माळ, शिंदेशाही पगडी आणि स्मृतीचिन्ह देऊन उपस्थितांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले,
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन हे अत्याचाराविरोधात विद्रोह करण्याचे, स्वधर्मासाठी संघर्ष करण्याचे, स्वराज्य स्थापित करण्याचे होते. राज्याचा उद्देश हा लोककल्याणसाठी आहे, हा संदेश त्यांनी दिला आहे. उत्तम शासक कसा असावा, याचे उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवले आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नाही, तर एक विचार आहे.
अमित शहा लिहिणार शिवरायांवर पुस्तक
यावेळी अमित शहा यांच्या विषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,
अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे मोठे जाणकार आणि विद्धान आहेत. ते शिवप्रेमी आहेत. खूप जणांना माहिती नसेल, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाचा शहा यांनी अभ्यास केला आहे.
अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासावर पुस्तक लिहिणार आहेत. आणि हे पुस्तक लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पुस्तक लिहिण्यासाठी पुरावे म्हणून लंडनमधून काही दस्तऐवज आणण्याचा मानसही अमित शहा यांनी केला आहे.
SL/KA/SL
19 Feb.2023