गारेगार आरामदायी लक्झरी प्रवासाला ‘बेस्टची पसंती’ ; रोज ३०० प्रवाशांचा प्रिमियम बसने प्रवास
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सेवेत इलेक्ट्रिक वातानुकूलित प्रिमियम बसेस आणल्या आहेत. १२ डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या प्रिमियम बसने रोज ३०० प्रवासी लक्झरी प्रवास करत असून ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान प्रिमियम बसेसना प्रवासी पसंती देत असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र lokesh chandra यांनी सांगितले. दरम्यान, प्रिमियम बस सेवेला पसंती बघता आणखी तीन मार्गावर लवकर सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
ओला ऊबेर पेक्षा स्वस्त, आरामदायी, गारेगार प्रवास करता यावा म्हणून बेस्ट उपक्रमाने प्रिमियम बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. ठाणे ते बीकेसी व वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान १२ डिसेंबरपासून प्रिमियम बस सेवा प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावू लागली आहे. १२ ते १८ डिसेंबर दरम्यान एक हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रिमियम बसने प्रवास केला असून सध्यस्थितीत रोज ३०० प्रवासी गारेगार प्रिमियम बसने प्रवास करत असल्याचे चंद्र यांनी सांगितले. प्रवाशांची पसंती लक्षात घेता उद्यापासून खारघर ते बीकेसी, ठाणे ते पवई(हिरानंदांनी) आणि चेंबूर ते कफ परेड या तीन मार्गांवर १० प्रिमियम बस चालविण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
१२ डिसेंबरपासून बीकेसी ते ठाणे आणि वांद्रे रेल्वे स्थानक ते बीकेसी दरम्यान चार प्रिमियम सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे घरातून बेस्टच्या ‘चलो मोबाईल’ ॲपवर सीट आरक्षित करता येत असून प्रवाशांना घर बसल्या तिकीट बुक करता येत आहे. एकूण दोन हजार प्रिमियम बस दाखल होणार असून त्यापैकी २० बस दाखल झाल्या आहेत. ठाणे ते बीकेसी दरम्यान पहिली प्रिमियम बस सुरु झाली असून त्यानंतर खारघर ते बीकेसी, ठाणे ते पवई आणि चेंबूर ते कफ परेड दरम्यान प्रिमियम बस चालविण्यात येत आहे.
दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे, पुश बॅक सिट्स, सिट्स समोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा, वातानुकूलित लक्झरी या बसची वैशिष्ट्य असणार आहे.
ML/KA/PGB
4 Jan 2022