१७८ वर्षांच्या समृद्ध परंपरेचा रंगभूमी दिन
मुंबई,दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज मराठी रंगभूमी दिन. ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली इथं ज्येष्ठ दिग्दर्शक विष्णुदास भावे यांनी सर्वात पहिलं मराठी नाटक सीता स्वयंवर रंगभूमीवर सादर केलं. त्यानंतर गेल्या १७८ वर्षात संगीत नाटकसह विविध प्रकारच्या दर्जेदार मराठी नाटकांमुळे ही रंगभूमी समृध्द झाली आहे.
या दिवसाच्या स्मरणार्थ ५ नोव्हेंबर १९४३ रोजी या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनाच्या निमित्ताने नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्ह्णून घोषित करण्यात आला होता.
दरवर्षी यादिवशीच रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या कलावंताला विष्णुदास भावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ज्येष्ठ नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश आळेकर यंदाच्या विष्णूदास भावे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आज दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते आळेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
SL/KA/SL
5 Nov. 2022