एअरटेल 5G ग्राहकसंख्येबाबत घडले असे काही…
दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान मोदी यांनी ५ जी सेवेची मुहूर्तमेढ केल्यानंतर खासगी क्षेत्रातील अग्रणी दूरसंचार कंपनीने यशाचा टप्पा गाठल्याची बातमी सध्या फिरते आहे. ही कंपनी दुसरी तिसरी कोणती नसून भारती एअरटेल आहे. एअरटेलने नवीन युगाच्या ‘५ जी’ सेवेसाठी पहिल्या ३० दिवसांतच दहा लाख ग्राहकसंख्येचा विक्रमी टप्पा ओलंडला आहे. सध्या कंपनीने ठरावीक शहरांमध्ये ‘५ जी’सेवेला सुरुवात केली आहे. तरीही हा प्रतिसाद मोठा आहे.
दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळूरु, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथे एअरटेलने पहिल्या टप्प्यामध्ये मर्यादित स्वरूपात ‘५ जी’ची सेवा सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला ‘५ जी’च्या अनावरणाची घोषणा केल्यानंतर खासगी क्षेत्रातील भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओने सेवेला सुरुवात केली. एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी टप्प्याटप्प्याने विविध शहरांमध्ये सेवा विस्तारणार आहे. मात्र आताच या नवीन सेवेसाठी कंपनीने दहा लाख ग्राहकांचा टप्पा गाठला आहे. इतक्या कमी कालावधीत ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे, अशी प्रतिक्रिया भारती एअरटेलचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी रणदीप सेखॉन यांनी दिली.
चालू वर्षांत १ ऑगस्टला संपलेल्या दूरसंचार ध्वनिलहरींच्या लिलावात विक्रमी दीड लाख कोटी रुपयांची बोली लावली गेली. जिओसह, भारती एअरटेल, व्होडा-आयडिया या तीन मुख्य स्पर्धकांसह अदानी डेटा नेटवर्क्स या कंपनीने या लिलावात सहभाग घेतला होता.
‘५ जी’ फोनला वाढती मागणी
स्मार्टफोन बाजाराचा अभ्यास करणाऱ्या ‘आयडीसी’ या संशोधन संस्थेच्या मते, २०२० ते २०२२ च्या पहिल्या सहामाहीत ५.१ कोटी ‘५ जी’ स्मार्टफोनची आयात करण्यात आली . तसेच २०२३ पर्यंत स्मार्टफोन वापरणाऱ्या एकूण लोकांपैकी ५० टक्के लोकांकडे ‘५ जी’ सज्ज स्मार्टफोन असतील.
एअरटेल सध्या ४ जीच्या दरांमध्ये ५ जी सेवा प्रदान करत आहे. मात्र पुढील सहा ते नऊ महिन्यांत नव्या युगाच्या आधुनिक ‘५ जी’ सेवांच्या किमतींवर निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी गोपाल विठ्ठल यांनी दिली. सध्या ५ जी सेवा वापरण्यास अनुकूल असलेल्या सर्व स्मार्टफोनवर एअरटेल ५ जी प्लस नेटवर्कचा वापर शक्य आहे. मात्र आयफोन व ठरावीक स्मार्टफोनवर ५ जी सेवेचा लाभ घेण्यासाठी आणखी काळ प्रतीक्षा करावी लागेल.
TM/KA/SL
4 Nov. 2022