सुरांच्या माध्यमातून बाबासाहेबांना मानवंदना; ‘भीमांजली’चे डिजिटल पर्व सुरू!
मुंबई दि २९ : समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर उभे असलेले भारतीय संविधान म्हणजे आधुनिक भारताचा आत्मा! या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच भावनेतून २६ नोव्हेंबर २०२६ या संविधान दिनी साकारलेल्या मुंबई पत्रकार संघाच्या भव्य वास्तुत ‘भीमांजली’च्या अधिकृत संकेतस्थळाचे (www.bhimanjali.com) लोकार्पण महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव IAS डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवर हजर होते ज्यात पंडित मुकेश जाधव (प्रसिद्ध तबला वाद ताल विहार संगीत संस्थेचे संस्थापक ), वैशालीताई माडे (लोकप्रिय बॅालीवूड गायिका), डॉ. विजय कदम (सूत्रसंचालक आणि आयोजन समितीचे समन्वयक ) गिरीश वानखेडे (प्रसिद्ध मूव्ही बिझनेस ॲनालिस्ट) , राजेश ढाबरे आयुक्त आआरएस, सोनाली रामटेके , शैलेश तामऱ्घाडगे दूरदर्शन चे वरीष्ठ अलोक खोब्रागडे , टीव्हीजे चे सरचिटणीस पंकज दळवी यांचा समावेश आहे.
या संकेतस्थळाचे सौंदर्य, सुबक रचना आणि कलात्मक मांडणी अक्षरशः मनाचा ठाव घेते. संकेतस्थळ उघडताच कानावर पडणारे सुमधुर भारतीय शास्त्रीय संगीत ही त्याची खासियत! संगीत, तंत्रज्ञान आणि बाबासाहेबांचे विचार यांचा असा सुरेल संगम म्हणजे केवळ संकेतस्थळ नव्हे, तर भीमांजलीच्या सांगीतिक प्रवासाचे एक सुंदर डिजिटल दालन आहे. बाबासाहेबांचे विचार जगभर पोहोचविण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
दशकभराची स्वरयात्रा; अकराव्या वर्षात पदार्पण!
२०१६ मध्ये सुरू झालेल्या भीमांजलीने दहा वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला असून यंदा अकराव्या वर्षात पदार्पण केले आहे. पहिल्याच पर्वात जागतिक कीर्तीचे बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी आपल्या बासरीच्या सुरांतून बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर भारतीय शास्त्रीय संगीतविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी या मंचावरून महामानवाला स्वरांजली अर्पण केली. ही केवळ सांगीतिक परंपरा नसून कलेच्या माध्यमातून सामाजिक कृतज्ञता व्यक्त करणारी अनोखी चळवळ आहे.
एखादा उपक्रम सुरू करणे सोपे; मात्र त्यामागचा विचार दशकभर जिवंत ठेवणे आणि त्याला चळवळीचे स्वरूप देणे ही मोठी गोष्ट आहे. भीमांजलीच्या या प्रवासामागे IAS डॉ. हर्षदीप कांबळे सरांची दूरदृष्टी, जिद्द आणि बाबासाहेबांच्या विचारांप्रती असलेली निष्ठा महत्त्वाची ठरली आहे.
कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव!
या कार्यक्रमानिमित्त समितीशी गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेल्या सुपर कोऑर्डिनेटर्स, कोऑर्डिनेटर्स आणि स्वयंसेवकांच्या योगदानाचा विशेष सन्मान करण्यात आला. मंगलताई जगताप, विजय जाधव, सुधीर परमेश्वर, तुषार कोष्टी, राजू रोकडे , गौतम पाईकराव रवी गुरचळ , दासरे , खरात , प्रदीप अडांगळे आणि पवन भिसे यांच्यासह मालाड, वरळी, कल्याण, नवी मुंबई, उल्हासनगर, चेंबूर, घाटकोपर आणि कांदिवली परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.
उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दलही मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सर्वांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सत्कार केवळ व्यक्तींचा नव्हता, तर त्यांच्या वेळेचा, कष्टांचा, निष्ठेचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव होता. विशेष म्हणजे, या सर्वांच्या पाठीवर सरांनी दिलेली कौतुकाची थाप ही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा देणारी ठरली.
कारण चळवळी केवळ विचारांनी उभ्या राहत नाहीत; त्या विचारांसाठी निःस्वार्थपणे झटणाऱ्या माणसांमुळे बळकट होतात. भीमांजलीच्या नव्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ही स्वरयात्रा आता डिजिटल विश्वातही पोहोचणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या सुरांतून बाबासाहेबांच्या विचारांचा संदेश जगभर घुमत राहो, हीच सदिच्छा!ML/ML/MS