नदीपात्रातील डोहात हजारो मासे मृत; दुर्गंधीने नागरिक त्रस्त
बीड दि २९ …एकीकडे दुष्काळाच्या झळांमुळे पाणीटंचाईचे संकट गडद होत असतानाच, परळी तालुक्यातील वानटाकळीजवळील वाण नदीपात्रात पुलाजवळ असलेल्या डोहात हजारो मासे मृत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत माशांचा खच पाण्यावर तरंगत असल्याने संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माशांच्या या सामूहिक मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, प्रशासनाने तातडीने पाण्याची तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने वाण नदीपात्रातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. अशातच वानटाकळी पुलानजीकच्या डोहात हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरात असह्य दुर्गंधी सुटली असून, नागरिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाणी कमी झाल्यामुळे आणि तापमानात वाढ झाल्याने पाण्यातील प्राणवायू (ऑक्सिजन) कमी होऊन मासे दगावले, की नदीपात्रात काही रासायनिक किंवा दूषित पाणी सोडले गेले आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.ML/ML/MS