चीनमध्ये पंख नसलेल्या फ्लाईंग कारची यशस्वी चाचणी
हुनान, दि. २५ : Tesla च्या फ्लाईंग कारला टक्कर देण्यासाठी चीननेही फ्लाईंग कार विकसीत केली आहे. विशेष म्हणजे ही कार पंख नसलेली आहे. या कारच्या प्रोटोटाईपने यशस्वी उड्डाण पूर्ण केलं आहे. या कारला उडण्यासाठीही धावपट्टीची गरज नाही. या प्रोटोटाईपचा हवेत कमाल वेग ताशी 150 किमी आहे. तर रेंज 300 किमीपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनमधील हुनान प्रांतातील चांगशा येथील काईहुई जनरल एव्हिएशन विमानतळावर या प्रोटोटाईपची पहिली चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान वाहनाने यशस्वी उड्डाण केलं आणि सुरक्षितपणे लँडिंगही केलं. या प्रकल्पाची सुरूवात 30 ऑक्टोबर 2026 रोजी चांगशी इकॉनॉमिक अँड टेक्नोलॉजिकल डेव्हलपमेंट झोनमध्ये झाली होती.
पॉवर सिस्टिम ही या उडणाऱ्या कारचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे . यात मल्टी-स्टेज व्हेटर डक्टेड फॅन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच उड्डाणासाठी लागणारे फॅन आणि पॉवर युनिट वाहनाच्या आत बसवण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेरच्या बाजूला पंखे किंवा प्रोपेलर दिसत नाही. या यंत्रणेतूनच निर्माण होणाऱ्या हवेचा दाब आणि जोराची दिशा नियंत्रित केली जाते. त्यामुळे वाहनाला वर उचलण्यासोबतच हवेत त्याचा तोल आणि दिशा सांभाळता येते. या तंत्रज्ञानामुळे धावपट्टीशिवाय उड्डाण आणि उभ्या दिशेने लँडिंग करणं शक्य होतं. हवेत एकाच जागी थांबण्याची क्षमताही यात आहे.
हे सिंगल सीटर म्हणजेच एका व्यक्तीसाठी तयार केलेलं मॉडेल आहे. याचं कमाल टेक ऑफ वजन 280 किलो असून, ते 120 किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकतं. जमिनीवर या वाहनाचा कमाल वेग ताशी 80 किमी तर हवेत ताशी 150 किमी आहे. या वाहनाची कमाल उड्डाण उंची 3, 000 मी असून, सामान्य कामासाठीची उंची सुमारे 100 मी आहे. एका चार्जिंग किंवा इंधन भरण्यानंतर 300 किमी पर्यंत रेंज मिळू शकते. असा दावा करण्यात येत आहे.
SL/ML/SL