मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जींचा नकार
कोलकाता, दि. 5 : काल जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये पराभव पत्करावा लागलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कोलकाता येथे एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास स्पष्ट नकार दिला.
त्या म्हणाल्या, “मी हरलेली नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी राजभवनात जाणार नाही.”
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न झाला आहे. भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आम्हाला अधिकृतपणे पराभूत करू शकते, पण आम्ही नैतिकदृष्ट्या निवडणूक जिंकली आहे.” त्या म्हणाल्या, “हा भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यातील संगनमताचा परिणाम आहे.”
ममता यांनी आरोप केला की, भाजपने मतमोजणी केंद्रांवर ताबा मिळवला होता. त्या म्हणाल्या, “त्यांनी माझ्या पोटात आणि पाठीत लाथा मारल्या आणि मला बाहेर ढकलले.” त्यांनी आरोप केला की, भाजप आणि निवडणूक आयोगाने एसआयआरच्या नावाखाली १०० जागा लुटल्या.
पश्चिम बंगालसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. बंगालमध्ये भाजपने २९४ पैकी २०७ जागा पहिल्यांदाच जिंकल्या. राज्यात पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होण्याच्या मार्गावर आहे. टीएमसीला केवळ ८० जागा मिळाल्या. १५ वर्षांनंतर सत्ता ममता बॅनर्जींची सत्ता गेली आहे.
SL/ML/SL