मुंबई अग्निशमन दलाच्या पायाभूत सुविधांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यावर अधिक भर देणार
मुंबई प्रतिनिधी
मुंबई अग्निशमन दल हे जगातील सर्वोत्तम दलांपैकी एक आहे. बदलत्या काळानुसार उंच इमारती आणि इतर आव्हाने उभी ठाकली असताना, अग्निशमन दल आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अग्निप्रतिबंधक उपायांवर अधिक भर देवून जनजागृती करत आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. अग्निशमन दलाच्या पायाभूत सुविधांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यावर आणखी भर दिला जाईल, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलातर्फे आयोजित वार्षिक अग्निकवायत स्पर्धा २०२६ ची अंतिम फेरी आज (दिनांक १८ एप्रिल २०२६) भायखळा येथील मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर श्रीमती तावडे बोलत होत्या.
महाराष्ट्र राज्य अग्निशमन सेवा संचालक श्री. संतोष वारीक, प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र अंबुलगेकर हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुंबई बंदरात दिनांक १४ एप्रिल १९४४ रोजी फोर्ट स्टिकीन या स्फोटके आणि दारूगोळा भरलेल्या जहाजाला आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्यावेळी आगीशी झुंज देताना मुंबई अग्निशमन दलाचे ६६ जवान शहीद झाले होते. या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करून, स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी समारंभाच्या प्रारंभी अभिवादन केले. त्यानंतर, अग्निशमन जवानांच्या पथकाने महापौरांना मानवंदना दिली.
या समारंभात महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, मुंबई कधीच झोपत नाही, असे म्हटले जाते. मात्र, मुंबईकर शांत झोप घेवू शकतात, कारण मुंबई अग्निशमन दल सतत जागे असते. १८६५ पासूनची ही अग्निशमन सेवा आणि त्याही आधीपासूनची अग्निसुरक्षेची परंपरा बलिदान आणि कर्तव्यनिष्ठेने समृद्ध आहे. मुंबईत उंच इमारती, अरुंद रस्ते आणि आगीप्रसंगी जीव गुदमरून टाकणारे धुराचे संकट यासारखी आव्हाने पेलून अग्निशमन दल नागरिकांचे प्राण वाचवतात. अग्निशमन दल ‘फायर फायटिंग’बरोबरच ‘लाइफ सेविंग’वर भर देत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह कार्यरत आहे. मात्र त्यांच्या धैर्याबरोबरच नागरिकांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. आग लागल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आग टाळण्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे. फायर ऑडिट करणे, गॅस गळतीकडे लक्ष देणे आणि सुरक्षेचे नियम पाळणे हे प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. बृहन्मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक साधने, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा वाढवत आहे. विकास आराखडा २०३४ अंतर्गत नवीन अग्निशमन केंद्रे उभारण्यावर भर देत आहे.
यासह ‘फायर रॅली’ आणि जनजागृती उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षा संस्कार रुजवण्याचा प्रयत्न होत आहे, असे महापौर श्रीमती रितू तावडे यांनी नमूद केले.
प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र अंबुलगेकर यांनी समारंभाचे प्रास्ताविक केले.
वार्षिक अग्नी कवायत स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्व संघांनी प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. प्रत्येक संघाने अत्यंत कमी वेळेत आणि योग्य नियोजनासह ड्रिल पूर्ण करण्यासाठी कौशल्यपूर्ण प्रयत्न केले. उपस्थित अधिकारी, जवान आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे मनोबल उंचावले. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. अथक परिश्रमानंतर यश संपादन करताच विजेत्या संघांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जल्लोषपूर्ण जयघोष करत आनंद व्यक्त केला.
वार्षिक अग्नी कवायत स्पर्धेचा अंतिम निकाल
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ
➡️ फोर्ट अग्निशमन केंद्र
उत्कृष्ट फायरमन
➡️ यंत्रचालक श्री. नितीन तुकाराम जाधव
फायर पंप ड्रिल स्पर्धा
➡️ प्रथम क्रमांक – मुलुंड अग्निशमन केंद्र
➡️ द्वितीय- बीकेसी अग्निशमन केंद्र
➡️ तृतीय क्रमांक – मेमनवाडा अग्निशमन केंद्र
➡️ चौथा क्रमांक – कुर्ला अग्निशमन केंद्र
➡️ पाचवा क्रमांक – फोर्ट अग्निशमन केंद्र
महिला अंतिम विजेते
➡️ प्रथम क्रमांक – फोर्ट अग्निशमन केंद्र
➡️ द्वितीय क्रमांक – विक्रोळी अग्निशमन केंद्र
ट्रिपल एक्सटेन्शन लॅडर मोटर पंप ड्रिल स्पर्धा
➡️ प्रथम क्रमांक – फोर्ट अग्निशमन केंद्र
➡️ द्वितीय क्रमांक – भायखळा अग्निशमन केंद्र
➡️ तृतीय क्रमांक – मरोळ अग्निशमन केंद्र
➡️ चौथा क्रमांक – कांदिवली अग्निशमन केंद्र
महिला अंतिम विजेते
➡️ प्राथम क्रमांक – फोर्ट अग्निशमन केंद्र
➡️ द्वितीय क्रमांक- विक्रोळी अग्निशमन केंद्र
वार्षिक अग्नी कवायत स्पर्धेची संक्षिप्त माहिती
मुंबई अग्निशमन दलाची अग्निकवायत स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून जवानांच्या शारीरिक क्षमता, तत्परता, धैर्य आणि संघभावनेची कसोटी असते. १९४८ पासून सुरू असलेल्या या परंपरेमुळे आपत्कालीन परिस्थितीत जलद, अचूक आणि शिस्तबद्ध काम करण्याचे प्रशिक्षण मिळते.
या स्पर्धांमध्ये शिडी चढणे, होज जोडणी, पाण्याचा वापर, बचावकार्य, वेग आणि समन्वय यांची चाचणी घेतली जाते. प्रत्येक अग्निशमन केंद्रातील संघ उत्साहाने सहभागी होतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक पद्धतींचा समावेश केल्यामुळे या कवायती अधिक प्रभावी झाल्या आहेत, ज्यामुळे जवानांची चपळाई आणि निर्णयक्षमता वाढते.
प्राथमिक फेरीनंतर उत्कृष्ट संघ अंतिम फेरीत स्पर्धा करतात, जिथे वेग, अचूकता आणि समन्वयाला विशेष महत्त्व असते. एकूणच, या स्पर्धांमुळे जवान सतत सज्ज राहतात आणि कोणत्याही दुर्घटनेला प्रभावी प्रतिसाद देण्याची त्यांची तयारी मजबूत होते.