पंतप्रधान मोदींनी साधला इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद
नवी दिल्ली, दि. २१ : संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा आज २२ वा दिवस आहे. दोन दिवसांपूर्वीच भारताकडून इराणला वैद्यकीय मदत पाठवण्यात आली. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर संवाद साधला आणि त्यांना ईद व नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. पंतप्रधानांनी लिहिले आहे की , “मी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पाझाश्कियान यांच्याशी बोललो. या सणासुदीच्या काळात मध्य-पूर्वेत शांतता आणि स्थैर्य नांदेल, अशी आशा आम्ही व्यक्त केली.”
इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणात, मोदींनी मध्य-पूर्वेतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील (जसे की तेल, वीज इत्यादी) हल्ल्यांचा निषेध केला, कारण याचा परिणाम प्रदेशातील शांततेवर आणि जागतिक पुरवठ्यावर होतो. ते म्हणाले की, सुरळीत व्यापारासाठी सागरी मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या संरक्षणासाठी केलेल्या मदतीबद्दल त्यांनी इराणचे आभारही मानले.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धात साथ न दिल्याबद्दल NATO सहयोगी देशांवर नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प म्हणाले की NATO देश भित्रे आहेत आणि अमेरिकेशिवाय ही युती फक्त कागदी वाघ आहे. ट्रम्प यांनी होर्मुज स्ट्रेटचा उल्लेख करत म्हटले की, ते खुले ठेवण्यासाठी लष्करी मदत देणे सोपे आहे, परंतु सहयोगी देश यातही मागे हटत आहेत. ते म्हणाले, “ही एक खूप सोपी लष्करी कृती आहे, ज्यात खूप कमी धोका आहे, पण त्यांना मदत करायची नाही. ते भित्रे आहेत आणि आम्ही हे लक्षात ठेवू.”
SL/ML/SL