कमळाबाईने समाजवाद्यांनाही केले गिळंकृत ?
-योगेश वसंत त्रिवेदी
समाजवादी चळवळीचे मूळ मानण्यात येणाऱ्या राष्ट्र सेवा दलातर्फे दरवर्षी १४ ऑगस्टच्या मध्यरात्री भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत असे. कारण स्वातंत्र्य सैनिकांच्या अथक परिश्रमाने भारताला १४ ऑगस्टच्या मध्यरात्री स्वातंत्र्य देत ब्रिटीश भारतातून चालते झाले/निघून गेले. ठाणे येथील मो. ह. विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्र सेवा दलाच्या कार्यक्रमात समाजवादी पक्षाचे नेते आणि माझे वडील वसंतराव त्रिवेदी यांच्या समवेत गेलो होतो. त्या वेळी थोर कवी प्रा. वसंत बापट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सुस्पष्ट शब्दांत सांगितले की, मी लिहिलेली ‘समाजवादी साथी गाती एका आवाजात. ऐक्याचे हे गीत घुमवू अवघ्या अवकाशात’ ही काव्यरचना आज दुर्दैवाने मलाच बदलून म्हणावेसे वाटते की, ‘समाजवादी साथी गाती सातही आवाजात’. राम मनोहर लोहिया यांनी समाजवादी चळवळीचा प्रारंभ केला.
लोकनायक जयप्रकाश नारायण, युसुफ मेहेर अली, कर्पुरी ठाकूर अशा दिग्गज समाजवादी साथींनी ही चळवळ पुढे नेण्याचे काम केले. तिथपासून जॉर्ज फर्नांडिस, मुलायमसिंह यादव, लालुप्रसाद यादव, बीजू पटनायक, नितीशकुमार, नवीन पटनायक, हुकूमदेव नारायण अशा असंख्य महानुभावांनी ही चळवळ पुढे नेली. महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीचे नेतृत्व श्रीधर महादेव उर्फ एसेम जोशी, नानासाहेब गोरे, बॅ. नाथ पै, दत्ता ताम्हाणे, बापूसाहेब काळदाते, प्रा. मधू दंडवते, मधू लिमये, निहाल अहमद, प्रा . सदानंद वर्दे, प्रा. ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, केशव उर्फ बंडू गोरे, मृणाल गोरे, डॉ. जी. जी. पारीख, डॉ. शांती पटेल, एस के शेट्ये, मंगला पारीख, कमल देसाई, नारायण तावडे, विवेक खाड्ये, रमेश जोशी, फ्रे. मा. पिंटो, राजाभाऊ चिंबुलकर, शरद राव, सोहनसिंह कोहली, भाई सामंत, परशुराम टावरे, पंढरीनाथ चौधरी, सूर्यकांत वढावकर, राधाकृष्ण मुणनकर, शैला सुळे, अलका नाबर, दशरथ पाटील, डॉमनिक घोन्सालविस, प्रा. स. गो. वर्टींपासून सुधाकर वावीकर, वासुदेव वर्तक, श्रीरंग साबडे, सुरेश खैरनार, प्रल्हाद नागेश उर्फ बाबा बेटावदकर, विनायक बेटावदकर, जगदीश दामले, डॉ. वि. भि. सरदार, सलामतराय पुरुस्वानी, काशामल बादलदास, सुहास कोते, वासुदेव खानचंदानी, विलास विचारे, सुधीर चव्हाण, यांच्यापर्यंत फार मोठी मांदियाळी या चळवळीने पाहिली.
नाट्य चित्र सृष्टी गाजविणारे निळू फुले, दादा कोंडके, सुहिता थत्ते हेही राष्ट्र सेवा दलाच्या मुशीतून तयार झालेले. शिवसेना वाढविणारे दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर, साबिरभाई शेख हेही राष्ट्र सेवा दलाचेच. तसं पहायला गेलं तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेही खरे समाजवादीच. कारण त्यांनी कधी जात पात धर्म पाहिला नाही. जो कार्यक्षम आहे त्याला पदे दिली. रिकाम्या हाताला काम आणि रिकाम्या पोटाला अन्न ही संकल्पना बाळासाहेब ठाकरे यांची. त्यांनी मनोहर जोशी यांना ब्राह्मण म्हणून, नारायण राणे यांना मराठा म्हणून, लीलाधर डाके आणि गणेश नाईक यांना आगरी म्हणून मोठमोठाली पदे दिली नाहीत. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे वडील काकासाहेब गाडगीळ यांच्या पुणे येथील गाडगीळ वाड्यात एक बैठक झाली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पर्याय म्हणून राष्ट्र सेवा दल स्थापन करण्यात आले.
जसा भारतीय जनसंघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात आला तद्वतच राष्ट्र सेवा दलाच्या सेवा दल सैनिकांमधून समाजवादी कार्यकर्ते तयार झाले. शाखानायक शिबिर, दस्तानायक शिबिर भरवून समाजवादी विचारांचा कार्यकर्ता घडत गेला. कला पथकाने त्याला चांगला साज चढविला. मुंबई मधील परळ नायगाव, पुण्यापासून कोकणात समाजवादी चळवळीचे प्राबल्य दिसू लागले. उत्तर महाराष्ट्रात डॉ. मु. ब. शाह, डॉ. पितांबर सरोदे, गुलाबराव पाटील अशा असंख्य नेत्यांनी समाजवादी चळवळीचे काम गतीने पुढे नेले. इंदिरा गांधी यांनी सत्तेच्या मदमस्त हत्तीवर स्वार होऊन १९७५ साली आणिबाणी लादली आणि समाजवादी पक्ष, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल आणि संघटना कॉंग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात डांबले.
कॉंग्रेसचे तरुण तुर्क म्हणवले जाणारे कृष्णकांत, मोहन धारिया आणि चंद्रशेखर यांनी इंदिरा गांधी यांना लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या समवेत चर्चा करा, अशी सूचना केली. परंतु इंदिरा गांधी यांनी त्यांनाही कारावासात टाकले. इंदिरा गांधी यांच्या विरोधात देशात प्रचंड प्रमाणात वातावरण निर्माण झाले. गुप्तहेर खात्याने इंदिरा गांधी यांना तशी कल्पना देत सावध केले. परिणामी इंदिरा गांधी यांनी १९७७ साली आणिबाणी उठवून जानेवारी १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. दरम्यान, तुरुंगात असताना या सर्व इंदिरा गांधी विरोधी नेत्यांनी आपापसात चर्चा केली आणि मतभेदाचे १० टक्के मुद्दे बाजूला सारुन मतैक्याच्या नव्वद टक्के मुद्द्यांवर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. भारतीय लोकदलाच्या ‘नांगरधारी शेतकरी’ निशाणीवर सारे विरोधक मोठ्या संख्येने निवडून आले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आधी सत्तेवर आलेला जनता पक्ष नंतर स्थापन झाला. मार्च १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्यांनी १ मे १९७७ रोजी जनता पक्ष स्थापन केला.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने जनता पक्ष स्थापन झाला. परंतु पक्ष स्थापन करा आणि फोडा ही सवय जडलेल्या समाजवाद्यांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आदी संघाच्या नेत्यांवर दुहेरी निष्ठेचा वारंवार आरोप केला. परिणामी ६ एप्रिल १९८० रोजी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे शिंदे यांनी मुंबईत महा अधिवेशन भरवून भारतीय जनता पक्ष स्थापन केला. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने सुरु करण्यात आलेला ‘जनता पक्ष’ आणि पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघ मधील ‘भारतीय’ हा शब्द घेत जयप्रकाश नारायण यांची पुण्याई पुरेपूर उपयोगात आणून भारतीय जनता पक्ष स्थापन केला. राजा विश्वनाथ प्रतापसिंह यांनी जनता पक्षाचे जनता दलात रुपांतर केले परंतु डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी जनता पक्षाचे अस्तित्व कायम ठवले आणि २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वी डॉ. स्वामी यांनी जनता पक्ष हा भारतीय जनता पक्षात विलीन केला.
जशा समाजवादी पक्षांच्या चिरफळ्या झाल्या तद्वतच जनता पक्ष, जनता दल सुद्धा एकेका नेत्यांनी आपापली ओळख तयार करण्यासाठी स्थापन केले. बीजू पटनायक यांनी बीजू जनता दल, जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पार्टी, लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दल, नंतर शरद यादव आणि नितीश कुमार यांनी संयुक्त जनता दल स्थापन केला. मुलायमसिंह यादव यांनी समाजवादी पक्ष नव्याने अस्तित्वात आणला. प्रारंभीच्या काळात प्रजा समाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष होते. एकाची निशाणी झोपडी तर एकाचे झाड. मग ते दोन्ही पक्ष एकत्र आले. मोठ्या पक्षांनी मग या छोट्या छोट्या पक्षांना गिळंकृत केले. इंदिरा गांधी यांच्या विरोधात तुरुंगात गेलेले सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेसमध्ये सुखेनैव संचार करु लागले. डॉ. पी. व्ही मंडलिक ट्रस्ट, ताडदेव येथील जनता केंद्र, साने गुरुजी ट्रस्ट अशा काही संस्थांनी समाजवादी चळवळीची धुगधुगी कायम ठेवली आहे. परंतु जॉर्ज फर्नांडिस यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या बरोबर जुळवून घेत सत्तेचा सोपान स्वीकारला तर त्यांचे शिष्योत्तम शरद राव यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणे पसंत केले. जो कित्ता जॉर्ज फर्नांडिस यांनी गिरवला तोच कित्ता मग त्यांचे शिष्योत्तम नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर मोहित होत इकडून तिकडे उड्या मारीत ‘पलटूराम’ हा किताब पटकावला.
आधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) वळचणीला गेलेले नितीशकुमार पुन्हा इंडिया आघाडी मध्ये आले आणि ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न किताब जाहीर केला त्याबरोबर हा समाजवादी चेहरा टुण्णकन उडी मारत मोदींच्या कळपात सामील झाला. बिहार हे समाजवादी चळवळीचे मुख्य केंद्र. सिताबदियाराला जन्मलेल्या लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी पाटणामधील कदमकुऑं येथील आपल्या निवासस्थानाला सरकारच्या ताब्यात दिले आणि ते स्वतः पत्नी प्रभावती देवींच्या समवेत भाडे भरुन रहात होते. आज ते राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखण्यात येते. आज केंद्रा पासून सर्वच राज्यांत लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी राज्यशकट हाकीत आहेत. परंतु नैतिकता आणि मूल्याधिष्ठित राजकारणाला तिलांजली देत आयाराम गयाराम बनून ‘राजकीय पर्यटन’ करीत आहेत. कर्पुरी ठाकूर यांच्या पासून नितीशकुमार यांच्या पर्यंत सुरु असलेल्या समाजवादी चळवळीचे खच्चीकरण करण्याचा विडाच जणू भारतीय जनता पक्षाने उचलला असल्याचे दिसून येत आहे.
ज्येष्ठ पत्रकार माधवराव गडकरी यांनी मुंबई सकाळ मध्ये आपल्या ‘चौफेर’ या स्तंभात बापूसाहेब काळदाते आणि रामभाऊ म्हाळगी यांचे उदाहरण दिले आहे. बापूसाहेब काळदाते हे समाजवादी आणि रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय जनसंघाचे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या जनता पक्षाचे हे दोघेही खासदार. रामभाऊ म्हाळगी हे जेंव्हा पाचशे लोकांपर्यंत पोहोचत तेंव्हा बापूसाहेब काळदाते हे केवळ पन्नास लोकांपर्यंत पोहोचत. त्याचे कारण दोघेही खासदार असताना लोकांनी पाठविलेल्या पत्रांना उत्तर देणे हे कर्तव्य समजून ते काम आधी करायचे. पण फरक एवढाच की रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांडून पत्र लिहून घेत आणि स्वाक्षरी स्वतः करीत. संघ स्वयंसेवक यांना काम देण्याचे, रोजगार देण्याचे समाधान त्यांना लाभत असे. दुसरीकडे बापूसाहेब काळदाते हे राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकांना न सांगता स्वतः खर्डेघाशी करीत. त्यामुळे म्हाळगी कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचत असत तर काळदाते हे जास्त वेळात कमी लोकांशी संपर्क साधू शकत. माधवराव गडकरी यांचे हे उदाहरण मी व्यासपीठावरुन सांगत असे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत (आताच्या नव्हे) साऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाण्यासाठी कमीपणा वाटत नव्हता, पण समाजवादी नेत्यांनी राष्ट्र सेवा दल वाढविण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत. याचा पूरेपूर फायदा उठवत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने समाजवादी चळवळीचे पद्धतशीर खच्चीकरण करण्याचा, समाजवादी नेत्यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला, ज्याचे दृश्य परिणाम नितीशकुमार यांच्या आताच्या राजकीय परिस्थितीवरुन दिसत आहे. बिहारच्या मुख्यमंत्री पदावरुन थेट राज्यसभेवर पाठविण्याचे कार्य (कारस्थान) त्यांच्या संदर्भात झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा उत्तराधिकारी बिहारमध्ये पहायला मिळत आहे. एका समाजवादी नेत्यांनी तर कवीवर्य प्रा. वसंत बापट यांनी लिहिलेल्या ‘समाजवादी साथी गाती एका आवाजात,’ ऐवजी ‘समाजवादी माती खाती एका आवारात’ हे म्हणणे ही समाजवादी चळवळीची घोर विटंबनाच म्हणावी लागेल.
भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष सोबत घेतले त्या त्या ठिकाणी त्या त्या मित्रपक्षांना कमजोर करण्याचेच काम केले. मग त्यात समता, ममता, जयललिता, मेहबूबा मुफ्ती, अकाली दल, शिवसेना ही आलेच. तद्वतच समाजवादी चळवळ सुद्धा कमजोर करण्याचे किंबहुना समाजवादी नेत्यांना गिळंकृत करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केल्याचे आरोप करण्यात येतात. अर्थात हे जरी खरे असले तरी ही चळवळ खतम करण्यासाठी आपण किती जबाबदार आहोत याचे आत्मपरीक्षण सर्वच साथींनी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कुठेही असले तरी ते एकत्र येतात परंतु राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकांनी एकत्र येऊन ही समाजवादी चळवळ मजबूत करण्यासाठी काय प्रयत्न केले ? राष्ट्र सेवा दल हा माझा प्राणवायू आहे, असे म्हणणारे महाराष्ट्र माऊली पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचे अनुयायी आज साने नव्हे तर ‘नाणे गुरुजी’ झाले आहेत, हेच खेदाने म्हणावे लागते. भारतीय जनता पक्ष आणि जनता पक्ष /दल यांची आजची परिस्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी नरीमन पॉईंट येथील दोन्ही पक्षांची जवळ जवळ असलेली कार्यालये पाहिलीत तरी चित्र स्पष्ट होईल.
– योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१.
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)