बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या १० वर्षीय प्रतिभा शिनगारे या मुलीला न्याय कधी मिळणार ?
मुंबई, दि २०
पंचशील नगर, चेंबूर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये दिनांक १८/११/२०१९ रोजी बिल्डरांच्या हेतुपुस्सर हलगर्जीपणामुळे, पुनर्वसन इमारतीचे बांधकाम सुरु असताना संरक्षण जाळी न लावल्यामुळे एका १० वर्षाची प्रतिभा शिनगारे या निष्पाप मुलीच्या डोक्यात सिमेंटचा दगड पडून मृत्यू झाला. या मुलीला आज तक सात वर्षे झाली परंतु अजूनही न्याय मिळाला नाही. या मुलीला न्याय कधी मिळणार आता सवाल निवारा हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट संतोष सांजकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत घेऊन केला. ते पुढे म्हणाले बिल्डरच्या दबावामुळे, सुरुवातीला अज्ञात इसमाच्या नावाने टिळक नगर पोलीस ठाण्यात FIR क्र. ४४९ / २०१९ दाखल झाला, परंतु रहिवाशांच्या जनरेट्यामुळे व आंदोलनामुळे सदर गुन्ह्यात या योजनेचे विकासक मे. अरिहंत रिलेटर्स चे भागीदार म्हणून ३ आरोपीची नावे नमूद केली त्यामध्ये १. श्री. जतीन अरविंद मेहता, (गुजरात चे व्यापारी) २. श्री. चेतन भानुशाली, (भाजपचे गुजरातचे नेते) ३. श्री. देवेश चंद्र ठाकूर, (बिहारचे विद्यमान खासदार व जनता दल (युनायटेड) पक्षाचे नेते) यांची नावे आहेत. पोलिसांनी दिनांक ०३/१२/२०२० रोजी मा. विक्रोळी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. (PS/880/2020) ज्यामध्ये केवळ आरोपी क्र. १ वरच दोषारोप पत्र ठेवले, व आरोपी क्र. २ व ३ यांच्या विरोधात दोषारोप पत्र ठेवण्यास हेतुपुरस्सर टाळले. आरोपी क्र. २ यांची विकासक म्हणून केलेली नेमणूक रद्द केली असून, आरोपी क्र. ३ श्री. देवेश चंद्र ठाकूर हे आजही सदर योजनेत बिल्डर म्हणून काम बघतायेत. आरोपी क्र. ३ बिहारचे खासदार हे मागील ६ वर्षापासून जामीन न घेता फरार असून, पोलिसांनी यांना आजतागायत अटक तर केली नाहीच शिवाय यांच्याविरोधात कुठलीच कार्यवाही सुद्धा केली नाही.
सदर बाब हि अत्यंत संवेदनशील असताना, गुन्हा घडून ७ वर्षांचा कालावधी संपला तरी पोलिसांनी आजतागायत आरोपी क्र. २ व ३ च्या विरोधात दोषारोप पत्र सादर केले नाही, त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांना चौकशीसाठी बोलाविले नाही, त्यांचा जामीन घेतला नाही, त्यांना अटक केली नाही, किंवा त्यांना फरार सुद्धा घोषित केले नाही, हा पोलिसांचा निष्काळजीपणा आहे कि विकासकाला वाचविण्याचा केवीळवाणापणा आहे, हे समजायला मार्ग नाही. या प्रकरणामध्ये स्थानिक खासदार वर्षा गायकवाड, आमदार मंगेश कुडाळकर आणि नगरसेवक सुशम सावंत हे देखील काहीच आम्हाला दात देत नसून त्यांच्या आणि बिल्डरचे काही संगनमत आहे अशी आमची माहिती आहे. त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परी-६ चे श्री. समीर शेख यांच्या सांगण्यावरून टिळक नगर येथील पोलिसांनी पंचशील नगर मधील रहिवाशांवर, सोसायटीच्या पदाधिकाऱयांवर, व त्यांच्या वकिलांवर याच बिल्डरांच्या राजकीय दबावाखाली, खोटे गुन्हे दाखल केले आहे. परंतु रहिवाशांनी, किंवा सोसायटीने केलेल्या तक्रारींवर, बिल्डरांविरोधात आजतागायत गुन्हे दाखल केले नाही, हि खूप लाजिरवाणी बाब आहे. भारतीय संविधानाचे कलम १४ हे सर्व नागरिकांना समान न्यायाची हमी देते, परंतु टिळक नगर पोलीस ठाणे हे केवळ बिल्डरांच्या संरक्षणाचीच हमी देत असून कलम १४ चे उल्लंघन करत आहे.
टिळक नगर पोलीस ठाणे व पोलीस उपायुक्त परी-६ चे श्री. समीर शेख हे बिल्डरांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे, सदर प्रकरणात ते बिल्डरांना दोषमुक्त करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, म्हणून बिल्डरच्या हेतुपुरस्सर हलगर्जीपणामुळे, पुनर्वसन इमारती वे बांधकाम सुरु असताना संरक्षण जाळी न लावल्यामुळे, मृत्यू झालेल्या १० वर्षीय प्रतिभा शिनगारे या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक २३ मार्च २०२६ पासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरु करत आहे. जोपर्यंत या चिमुकल्या दहा वर्षीय प्रतिभा शिंगारे मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन अशाच प्रकारे अधिक तीव्र होईल. तसेच आमच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार असल्याची माहिती निवारा हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सांजकर यांनी दिली.KK/ML/MS