शिवरायांच्या विचारांची तलवार आणि बाबासाहेबांची लेखणी हीच आमची हत्यारे — दिव्या शिंदे
मुंबई, दि १२
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ सिझन सहा मधून ज्या पद्धतीने आपल्याला काढण्यात आले ती पद्धत केवळ अन्यायकारक नसून जाणून-बुजून केलेल्या भेदभावाचा आणि अपमानाचा स्पष्ट नमुना आहे अशा शब्दात या कार्यक्रमातील आघाडीची स्पर्धक दिव्या शिंदे हिने नुकतीच मुंबईतील प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर बोलताना तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.या वेळी तिच्यासोबत लोकांचे दोस्त रवि भिलाणे,पत्रकार संजय शिंदे,चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे,ज्योतीताई बडेकर,मयूर शिर्के आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सुबोध मोरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना दिव्या शिंदे म्हणाल्या की,मी तलवारीची धमकी दिल्याचा अर्धवट प्रचार केला जातोय.मात्र मी छत्रपती शिवरायांच्या विचारांची तलवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीची धार याचा आवर्जून केलेला उल्लेख जाणूनबुजून टाळला जात आहे.त्यामुळे माझी नाहक बदनामी होत आहे.
बिग बॉस च्या घरामध्ये केलेले एक सर्वसामान्य, अनौपचारिक विधान “धमकी” म्हणून रंगवून दिव्या शिंदे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. मात्र याच कार्यक्रमामध्ये यापूर्वी इतर स्पर्धकांनी उघडपणे धमकीवजा भाषा वापरूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता दुहेरी निकष (Double Standards) लावण्यात आले.
हे केवळ पक्षपाती नाही, तर जात, वर्ग आणि सत्तेच्या बाजूने उभ्या असलेल्या मनोरंजन व्यवस्थेचे कुरूप वास्तव आहे.अशी भावना सुबोध मोरे आणि संजय शिंदे यांनी व्यक्त केली.
महेश बनसोडे म्हणाले की,हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही.आतापर्यंत दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, गरीब आणि संघर्ष करणाऱ्या कलाकारांवर अशाच पद्धतीने अन्याय होत आलेला आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि टीआरपी प्रधान कार्यक्रम सतत सत्ताधारी मानसिकतेला पोषक भूमिका घेत आहेत आणि बहुजनांचा आवाज दाबला जात आहे.तर रवि भिलाणे यांनी, ही लढाई केवळ एका स्पर्धकासाठी नसून समता, न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांसाठीची लढाई आहे.या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि सत्य समाजासमोर मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले.KK/ML/MS