डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर
मुंबई, दि. ७ : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची स्थापना करुन मुंबईत गुजराती समाज बांधवांना विविध व्यासपीठ उपलब्ध करुन देणारे, मराठी आणि गुजराती साहित्य निर्मिती मध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच सुमारे ६० वर्षांहून अधिक काळापासून कच्छशक्ती नियतकालिक अखंडपणे प्रकाशित करणारे डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ हे नाटक मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. वसंत मारु आणि कवल सावला लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग माटुंगा (पश्चिम) येथील यशवंत नाट्यगृहात रात्री ८.४५ वाजता होणार आहे.
त्याचप्रमाणे या नाटकाचे प्रयोग २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झवेरबेन हॉल, घाटकोपर आणि २२ मार्च २०२६ रोजी न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातुश्री सभागृहात रात्री ८.४५ रोजी सादर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे २२मार्च रोजी डॉ. हेमराज शाह हे वयाची ८५ वर्षे पूर्ण करुन ८६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित हेमूदादा या नाटकाप्रमाणेच ‘डॉ. हेमराज शाह : एक समर्पित जीवन’ या शीर्षकाखाली डॉक्युमेंटरी फिल्म सुद्धा बनविण्यात आली आहे जी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये चमकली आहे. याच विक्रमादित्य व्यक्तिमत्वावर ‘कलष छलके’ ही कादंबरी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे.