मुख्य निवडणूक आयुक्त यांची मतदान,मतमोजणी केंद्र तसेच स्ट्राँग रूमला भेट
अलिबाग,दि. ६ :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार, दि.07 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याने मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज अलिबाग तालुक्यातील विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्राची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
मुख्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी रायगड जिल्हा परिषद शाळा झिराड, वरसोली, सेंट मेरी हाय स्कूल मतदान केंद्रे तसेच नेहुळी येथील मतमोजणी केंद्र,साहित्य वितरण केंद्र, स्ट्राँग रूमची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रविंद्र शेळके, अलिबाग निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा पूर्णतः सज्ज असून प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हील चेअर,प्रथमोपचार किट, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी बैठक व्यवस्था आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व तांत्रिक बाबींचीही पूर्तता करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, निकोप व भयमुक्त वातावरणात पार पडेल, असा विश्वास व्यक्त करीत मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.ML/ML/MS