मध्य रेल्वे मार्गावर ३ दिवसांचा विशेष मेगाब्लॉक, ९५६ लोकल आणि ७२ एक्सप्रेस रद्द

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या विक एण्ड काहीसा त्रासदायक ठरणार आहे. दररोज लाखो लोकांना वाहून नेणाऱ्या या मार्गावर शुक्रवार (दि.३१ मे) ते रवीवार (दि. २ जून) या कालावधीत देखभाल, दुरुस्तीच्या कारणास्तव विशेष मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवार ३० मे रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते रविवार २ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे. ब्लॉक वेळात एकूण ९५६ अर्थात २३ टक्के लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. त्याचवेळी ७२ मेल एक्सप्रेस देखील रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटीत ३६ तासांचा आणि ठाण्यात ६३ तास ब्लॉक आहे. स्थानकातील गर्दी आणि असुविधा टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा शक्य असेल तर सुट्टी द्या, असे आवाहन मध्य रेल्वेने सर्व सरकारी आणि खासगी आस्थापनांना केले आहे.
३६ तासांच्या ब्लॉकमध्ये सीएसएमटीकडे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्या दादरमध्ये (२२), ठाण्यात (२), पनवेल (३) , पुणे (५) आणि नाशिकमध्ये (१) गाडी रद्द करण्यात येणार आहे. याच वेळेत सीएसएमटी ऐवजी दादरवरून (२०) मेल-एक्स्प्रेस, पनवेलहून (३), पुण्यातून (५) आणि नाशिकहून (१) गाडी रवाना होणार आहे. मेल-एक्स्प्रेसच्या सविस्तर माहितीसाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
सीएसएमटी फलाट क्रमांक १० आणि ११ ची लांबी वाढविण्यासाठी तसेच ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक ५ आणि ६ ची रुंदी वाढविण्यासाठी मध्य रेल्वेवर एकाच वेळी दोन ब्लॉक घेतले जाणार आहेत. मुंबईतील प्रवाशांची संख्या अधिक असून त्यासाठी पायाभूत सुविधा वाढविणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन त्यासंबंधी मध्य रेल्वेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
सीएसएमटीत फलाट लांबीकरणासाठी ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे सीएसएमटी ते भायखळा/वडाळा रोड दरम्यान लोकल रद्द राहणार आहेत. ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी डाउन जलद मार्गावर ६२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ब्लॉक सुरू असताना जलद लोकल, मेल-एक्स्प्रेस पर्यायी मार्गावर चालवण्यात येणार आहे. रविवारी आणि शनिवारी रविवार वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत. स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असेल तरच लोकल प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
SL/ML/SL
29 May 2024