मुंबापुरीतला २२ फुटांचा कागदापासून बनवलेला पहिला गणराज
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उपनगरात अंधेरीचा विघ्नहर्ता म्हणून ख्याती पावलेला बाळगोपाळ मित्र मंडळाचा गणेशोत्सव यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. कोव्हिडनंतर पर्यावरण पूरक उत्सवाची कास धरताना मंडळाने यंदा सुमारे २२ फुटांची कागदी गणेशमूर्ती स्थापन केली आहे.
बाळगोपाळ मित्र मंडळ यावर्षी ४९ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. अंधेरीच्या पूर्व भागातील प्रकाशवाडी परिसरात त्यावेळी कामगारवर्ग मोठया प्रमाणात रहात होता. १९७४ साली मधुकर जांभळे, सुरेश भावंगीर, प्रेमानाथ वऱ्हाडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत गणेशोत्सव सुरु केला. त्यानंतर आजतागायत कुठल्याही विघ्नाशिवाय हा उत्सव सुरु आहे. कोव्हिड काळातही शासकीय नियम पाळून मंडळाने गणेशोत्सव साजरा केला. कोव्हिड काळातली एकूण परिस्थिती पाहिल्यावर पर्यावरण पूरक गणेशोत्सव करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसार यावेळी सुमारे २२ फुटांची कागदापासून बनवलेला गणराज स्थापन करण्यात आला. मूर्तिकार राजेश मयेकर यांनी दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ही भव्य मूर्ती साकारली आहे.
विद्यार्थ्यांनी अर्पण केला सोन्याचा दात
अंधेरीचा विघ्नहर्ता म्हणून ओळख पावलेल्या गणरायाने परिसरातीलच नव्हे तर इतरांनाही आपली प्रचिती दाखवून दिली आहे. परिसरातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अडचण, समस्या जाणवत होती. त्यावेळी त्यांनी गणरायाला साकडं घालत संकटातून सोडवण्यासाठी प्रार्थना केली. आपल्यावरील विघ्न टळल्यावर या विद्यार्थ्यांनी घरुन मिळणारा पॉकेटमनी एकत्र केला. पण हे पैसे कमी पडणार हे लक्षात आल्यावर त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना पैसे कशासाठी गोळा केलेत याची कल्पना दिली. त्यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीची रक्कम आपल्याकडून देत विद्यार्थ्यांच्या वतीने गणरायाला सोन्याचा दात अर्पण केला. असा अनुभव कित्येक भक्तांना आल्यामुळे त्यांनी अंधेरीचा विघ्नहर्ता अशी उपाधीच दिली.
ML/KA/SL
24 Sept. 2023