मुंबईतील अपघातप्रवण 20 वाहतूक चौक होणार सुरक्षित

 मुंबईतील अपघातप्रवण 20 वाहतूक चौक होणार सुरक्षित

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईतील वाहतूक चौक (ट्रॅफिक जंक्शन) सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित असावेत, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (BIGRS) या जागतिक उपक्रमातील भागीदारांच्या सहकार्याने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या माध्यमातून मुंबई महानगरातील सर्वाधिक अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) अशा 20 वाहतूक चौकांचा नवीन आराखडा तयार करुन त्यानुसार त्यांचा कायापालट होणार आहे.

मुंबईतील सर्वाधिक अपघात प्रवण वाहतूक चौकांची पुनर्रचना करण्यात येत आहे. यामध्ये वाहतूक चौक सुरक्षित बनवताना, विशेषत: ज्यांना रस्ते अपघातांचा अधिक धोका संभावतो असे वापरकर्ते जसे की, पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकीस्वार यांच्यासाठी वाहतूक चौक अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेला ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी मधील भागीदारांकडून तांत्रिक सहाय्य लाभणार आहे. या भागीदारांमध्ये ग्लोबल डिझायनिंग सिटीज् इनिशिएटिव्ह (GDCI) आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) यांचा समावेश आहे.

याविषयीची प्रादेशिक बैठक आज संपन्न झाली. या बैठकीला महानगरपालिकेचे उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले , प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) मनीषकुमार पटेल यावेळी उपस्थित होते . बैठकीनंतर तज्ज्ञ, परदेशातून आलेल्या मान्यवरांनी मुंबईतील ५ जंक्शन्सला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बृहनमुंबई महानगरपालिकेने ब्लॅक स्पॉट ठिकाणी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली .

उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले या उपक्रमाची माहिती देताना म्हणाले की, मुंबई महानगरातील इतर ठिकाणांच्या तुलनेत या २० अपघात प्रवण चौकांच्या ठिकाणी अधिक अपघात होवून पर्यायाने अधिक मृत्यू आणि जखमींची नोंद झाली आहे. त्यामुळे या चौकांचा कायापालट करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. या सर्व ठिकाणी अपघातांची संख्या कमी व्हावी, पर्यायाने नागरिकांचा वावर सुरक्षित व्हावा, या दृष्टिकोनातून सदर सर्व ठिकाणी चौकांच्या रचनेमध्ये बदल करण्यात येईल. यासाठी महानगरपालिकेचे अभियंते हे ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी मधील भागीदारांसोबत कामकाज करत आहेत.

वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज् इनिशिएटिव्ह यांनी सन २०२१-२०२२ मध्ये या अपघात प्रवण चौकांचे सर्वेक्षण केले होते आणि आता संबंधित वाहतूक चौकांच्या ठिकाणी व रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन आराखडे बनवण्यात येत आहेत. त्याद्वारे पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकीस्वार या रस्ते अपघातांचा सर्वाधिक धोका असलेल्या घटकांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यात येणार आहे.

वाहतूक चौकांमधील अपघात, मृत्यू आणि गंभीर दुखापतींची संख्या कमी करुन एकूणच वाहतूक चौक परिसरात सुरक्षितपणे वावरता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज् इनिशिएटिव्ह हे वेगवेगळ्या पायाभूत सुविधा बदल समाविष्ट करणार आहेत. यामध्ये, पादचाऱयांना ओलांडण्यासाठी मार्गिकेचे व पदपथाचे रुंदीकरण करणे, रस्ता ओलांडण्याचे अंतर कमी करण्यासाठी नवीन आश्रय स्थाने निर्माण करणे, वाहतुकीचा वेग मर्यादीत ठेवण्यासाठी गतिरोधक व पट्ट्या यांच्यासारख्या पर्यायांचा अवलंब करणे, यांचा समावेश असणार आहे.

ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी मधील एक भागीदार असलेल्या वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडियाचे एकात्मिक परिवहन उपक्रम प्रमुख श्री. धवल अशर यासंदर्भात म्हणाले की, पादचाऱयांसाठी पुरेशा पायाभूत सुविधा पुरवल्या तर नागरिकांना रस्त्यावर चालणे, थांबणे आणि सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे शक्य होते. परिणामी, वाहनांच्या थेट मार्गात पादचारी धडकण्याचे प्रमाण कमी होते. याचाच अर्थ पादचाऱयांना नजरेसमोर ठेवून आराखडे तयार केले तर १) रस्ते सर्व वापरकर्त्यांसाठी सुरक्षित होतात, २) पादचारी आणि वाहनांमधील संघर्ष घटतात, ३) वाहतूक अधिक प्रवाही व सुरळीतपणे सुरु राहते. अशाच प्रकारचा विचार करुन अमर महाल सह एकूण १२ वाहतूक चौकांच्या नवीन आराखड्यावर वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत कामकाज करत आहे.

ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी मधील आणखी एक भागीदार असलेल्या ग्लोबल डिझायनिंग सिटीज् इनिशिएटिव्हचे आशिया व आफ्रिका प्रादेशिक प्रमुख श्री. अभिमन्यू प्रकाश म्हणाले की, या अपघात प्रवण क्षेत्रांमध्ये सुधारणेसाठी सर्व शक्यतांवर आम्ही पुनर्विचार करत आहोत. त्यासाठी जागतिक रस्ते आराखडा मार्गदर्शक (ग्लोबल स्ट्रीट डिझाईन गाईड) तत्त्वांचा आधार घेत आहोत. ही मार्गदर्शक तत्वं अधिकृतपणे मुंबईने स्वीकारलेली व मुंबईसाठी असतील. पादचाऱयांना ओलांडण्यासाठी मार्गिका व पदपथ रुंदीकरण, नवीन आश्रय स्थाने, वाहतूक वेग मर्यादीत रहावा म्हणून गतिरोधक व पट्ट्या अशा वेगवेगळ्या पर्यायांचा धोरणात्मक स्वीकार केला जात आहे. तसेच, निवडक ठिकाणी रस्ते संरेखन व अरुंदीकरण केले जाईल, जेणेकरुन रहदारीचा प्रवाह सुरळीत होवून रस्ते अधिक सुरक्षित होतील. सदर सुधारणांसोबत, मुंबईतील रस्ते अपघात कमी करण्याच्या आमच्या दीर्घकालीन उद्दिष्टाच्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिका अभियंते व मुंबई वाहतूक पोलिस विभागाला प्रशिक्षण देत आहोत, जेणेकरुन कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि शाश्वत अशा रस्ते आराखड्यांचे मूलभूत ज्ञान असावे, हे सर्व पुढाकार घेत असल्याचे श्री. अभिमन्यू प्रकाश यांनी नमूद केले.

चौकटः

रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या (MORTH) मते, अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅकस्पॉट) याचा अर्थ, राष्ट्रीय महामार्ग,राज्य महामार्ग,शहरी रस्त्यांवरील ५०० मीटर अंतराचा असा पट्टा की, जेथे मागील सलग तीन वर्षांपासून-
अ) एकूण ५ गंभीर रस्ते अपघात किंवा अपघातांमुळे मृत्यू, किंवा
ब) एकूण १० किंवा अधिक मृत्यू.

मुंबईत सुरक्षित करण्यात येणाऱ्या २० अपघात प्रवण (२०१९-२०२१) ठिकाणांची यादी पुढीलप्रमाणे आहे.-
१) अमर महल जंक्शन, टिळक नगर, घाटकोपर

२) पूर्व द्रुतगती महामार्ग आणि जोगेश्वरी- विक्रोळी जोड रस्त्याचा छेदभाग (इंटरसेक्शन), कांजूरमार्ग (पूर्व)

३) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि शीव (सायन) वांद्रे जोडरस्त्याचा छेदभाग (इंटरसेक्शन) (कलानगर चौक), वांद्रे (पूर्व)

४) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जवाहरलाल नेहरू मार्गाचा छेदभाग, सांताक्रूझ (पूर्व)

५) घाटकोपर अंधेरी जोडरस्ता आणि पूर्व द्रुतगती महामार्ग, घाटकोपर (पूर्व) यांचा छेदभाग

६) प्रियदर्शिनी वाहतूक चौक, शीव-चेंबूर

७) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्ता छेदभाग, जोगेश्वरी (पूर्व)

८) पूर्व मुक्त मार्ग आणि घाटकोपर- मानखुर्द जोडरस्ता छेदभाग, गोवंडी (पश्चिम)

९) शीव वाहतूक चौक, शीव (पश्चिम)

१०) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि आकुर्ली मार्गाचा छेदभाग, कांदिवली (पूर्व)

११) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि गोरेगाव मुलुंड जोडरस्ता, गोरेगाव (पूर्व) चा छेदभाग

१२) किंग सर्कल वाहतूक चौक, माटुंगा (पूर्व)

१३) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि एन. एस फडके मार्ग, अंधेरी (पूर्व) चा छेदभाग

१४) सांताक्रुज चेंबूर जोडरस्ता आणि लालबहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला (पश्चिम) चा छेदभाग

१५) शीव-पनवेल महामार्ग आणि घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता, मानखुर्दचा छेदभाग

१६) छेडा नगर वाहतूक चौक, घाटकोपर (पूर्व)

१७) संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य, बोरिवली (पूर्व)

१८) साकीनाका वाहतूक चौक, अंधेरी (पूर्व)

१९) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग, दहिसर (पूर्व) चा छेदभाग

२०) घाटकोपर – अंधेरी जोडरस्ता आणि लालबहादूर शास्त्री मार्गाचा छेदभाग

ML/KA/PGB
6 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *