सलमान खानला ठार मारण्याची धमकी देणारा १६ वर्षीय मुलगा ताब्यात

मुंबई दि.11( एम एमसी न्यूज नेटवर्क): बॉलिवूडचा दबंग सलमान खान याला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी शहापूर तालुक्यातील डोळखांब येथून ताब्यात घेतले आहे.
सोमवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने मुंबई नियंत्रण कक्षाला फोन करून सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली. ‘मी ३० तारखेला सलमान खानला मारणार आहे, त्याला सांगा’, असे सांगून या व्यक्तीने दूरध्वनी बंद केला. आपले नाव रॉकी भाई, गौशाला रक्षक असून आपण राजस्थानमधील जोधपूर येथून बोलत असल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तपास केला असता दूरध्वनी करणारी व्यक्ती ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील डोळखांब येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक शहापूरला गेले. पोलिसांना पाहताच तो दुचाकीवरून पळ काढत होता. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्यानेच धमकीचा दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. अखेर पुढील तपासासाठी या मुलाला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यापूर्वी अनेक वेळा सलमान खानला बिष्णोई टोळीकडून धमकी आली होती. तसेच त्याच्या कार्यालयात धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते.
SW/KA/SL
11 April 2023