दहावी – बारावी बोर्ड परीक्षांसाठी मुंबई पोलिसांचे कठोर निर्बंध लागू
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या सुरक्षेसाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाने कठोर निर्बंध जारी केले आहेत. ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात हे निर्बंध लागू असतील. विद्यार्थ्यांना शांत आणि सुरक्षित वातावरण मिळावे तसेच पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.
परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात फक्त परीक्षार्थी, शिक्षक, परीक्षा अधिकारी आणि अधिकृत कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल. इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
दोन किंवा अधिक लोकांना एकत्र उभे राहण्यास किंवा विनाकारण थांबण्यास सक्त मनाई आहे.परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्राजवळ मोबाईल, लॅपटॉप, झेरॉक्स, इंटरनेट, फॅक्स आदी उपकरणे आणि सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लाऊडस्पीकर, ध्वनिवर्धक किंवा कोणत्याही प्रकारचा आवाज वाढवणारे उपकरण वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
परीक्षेशी संबंधित कोणताही मजकूर लिहिणे, भिंतीवर चिकटविणे किंवा प्रसारित करणे हे पूर्णपणे निषिद्ध असेल.
पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यामध्ये दंड किंवा इतर कायदेशीर कारवाईचा समावेश असेल.
मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या आदेशाचे उद्दीष्ट विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि निर्भय वातावरणात परीक्षा देता यावी हे आहे. परीक्षेच्या गोपनीयतेचे उल्लंघन होऊ नये यासाठी हे निर्बंध अत्यंत महत्त्वाचे आहेत.
परीक्षा काळात पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे
ML/ML/PGB 6 Feb 2025