करुणा मुंडेना पोटगी, मात्र कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप कोर्टाने फेटाळला …

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप आज वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने फेटाळून लावत करुणा शर्मा यांना सव्वा लाख रुपयांची तर या दोघांच्या मुलीला 75 हजार रुपयांची प्रति महिना पोटगी देण्याचा आदेश जारी केला आहे.
धनंजय मुंडे यांच्या आपण द्वितीय पत्नी असून मुंडे हे आपल्यावर कौटुंबिक हिंसाचार करून आपल्याला त्रास देत असल्याबद्दल ची तक्रार करुणा शर्मा यांनी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केली होती. त्यावर धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत नाही असा निर्वाळा आज न्यायालयाने दिला, मात्र करुणा आणि त्यांची मुलगी यांना पोटगी मंजूर करताना दोघींना मिळून दोन लाख रुपयांची पोटगी धनंजय मुंडे यांनी द्यावी असा आदेशही न्यायालयाने पारित केला आहे.
दरम्यान मुंबई न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी करुणा शर्मा यांनी केलेल्या अर्जावर आज झालेल्या सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. अर्जदार करुणा शर्मा आणि त्यांची मुलगी शिवानी यांच्या सध्याची आर्थिक परिस्थिती तसेच अन्य निकषांच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी मिळून २ लाख रुपये (अर्जदार क्र. १ यांना १.२५ लाख तर अर्जदार क्र. ३ यांना ७५ हजार रुपये प्रति महिना) पोटगी म्हणून देण्याचा अंतरिम निर्णय दिला आहे असे मुंडे यांच्या वकिलाने स्पष्ट केले आहे.
धनंजय मुंडे यांच्या वरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर काहीही निर्णय अद्याप दिलेला नसून, याबाबत काही माध्यमांवर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार आहे. असे मत धनंजय मुंडे यांच्या वकील ऍड. सायली सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
धनंजय मुंडे यांनी स्वतःच आपल्या व्यक्तिगत आयुष्याबाबत याआधी जाहीर खुलासा करत ते करुणा शर्मा आणि मुले यांच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहिल्या बाबत त्यांनी यापूर्वीच कबुली दिलेली असून, आजच्या अंतरिम आदेशाला त्याचाच आधार असल्याचे वकील सायली सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
ऍड. सावंत यांनी याबाबत माध्यमांना सुध्दा विनंती केली असून, सर्व माध्यमांनी जबाबदार तसेच अचूक वार्तांकन करावे तसेच न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर आधारित कोणतीही दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या वार्तांकन पासून दूर रहावे, कुणाचीही नाहक बदनामी होईल, असे चुकीचे वार्तांकन करू नये. कुठल्याही माध्यम कर्मिना याबाबत अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास ते वकिलांना मागावे, असे आवाहन ऍड.सायली सावंत यांनी केले आहे.
ML/ML/PGB 6 Feb 2025