#नेपाळने पर्वतारोहणासाठी पर्यटक व्हिसा देण्याचा घेतला निर्णय बिझनेस October 7, 2020 431 1 minute read Facebook Twitter LinkedIn WhatsApp काठमांडू, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेपाळ सरकारने सुमारे सात महिन्यांनतर परदेशी पर्यटकांना पर्यटक व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वतारोहण आणि ट्रेकिंगच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबरपासून परदेशी पर्यटकांचे स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्कृती, पर्यटन व नागरी उड्डयन मंत्रालयाने सांगितले. कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी नेपाळ सरकारने मार्चच्या प्रारंभी पर्यटकांना व्हिसा देण्याचे थांबवले होते. पर्यटन मंत्रालयाचे प्रवक्ते कमलप्रसाद भट्टराई यांनी सांगितले की, “नेपाळमध्ये पर्वतारोहण आणि ट्रेकिंगसाठी नेपाळला भेट देणारे परदेशी लोक आमच्या दूतावासातून पर्यटक व्हिसा घेऊ शकतात. नेपाळी मुत्सद्दी मिशन गैरहजर असलेल्या देशांतून येणारे पर्यटक आगमन व्हिसा घेऊ शकतात. ” नेपाळच्या इमिग्रेशन विभागाचे महासंचालक रमेश कुमार केसी हे म्हणाले की, “आम्ही परदेशी पर्यटकांना व्हिसा देण्याबाबत पर्यटन मंत्रालय आणि इतर संबंधित एजन्सींशी समन्वय साधू. सुमारे सात महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच परदेशी पर्यटकांना नियमित पर्यटक व्हिसा देण्यात येणार आहे.” नेपाळच्या सरकारी एजन्सींच्या सूचना लक्षात घेऊन इमिग्रेशन विभागाने मर्यादित संख्येने पर्यटकांना व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, त्याअंतर्गत परदेशी पर्यटकांना नेपाळला पोहोचण्यापूर्वी किमान 72 तासांच्या आत घेण्यात आलेल्या पीसीआर तपासणीचा अहवाल सादर करावा लागेल. हा अहवाल नकारात्मक असेल तरच पर्यटकांना परवानगी असेल. तसेच त्यांना कागदपत्रे देखील सादर करावी लागतील ज्यावरून हे स्पष्ट होईल की त्यांनी नेपाळमध्ये सात दिवसांसाठी अलग राहण्यासाठी हॉटेल बुक केले आहे. अलग ठेवण्याच्या पाचव्या दिवशी पर्यटकांची आणखी एक कोरोना टेस्ट होईल. या अहवालात नकारात्मक आल्यानंतरच ते पर्वतारोहण किंवा ट्रेकिंगसाठी जाऊ शकतील.भट्टराई म्हणाले की कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत सरकारने आपले काही क्षेत्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. Facebook Twitter LinkedIn WhatsApp