छटपूजेआधी यमुना नदी स्वच्छ होणार, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळी झाल्यावर लगेचच उत्तर प्रदेशामध्ये छटपूजेचा सण येतो. यामध्ये यमुनानदीचे मोठे महत्त्व आहे. मात्र प्रचंड प्रदुषणामुळे यमुना नदीचे पाणी मानवी वापरास योग्य असल्याचे दिसत नाही. दिवाळीनंतर होणाऱ्या यमुना छट पूजेची तयारी अंतिम टप्प्यात असून पूजेआधी यमुना नदी स्वच्छ केली जाईल अशी ग्वाही दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी दिली आहे. यमुनेला प्रदुषणामुळे फेस आला आहे . हा फेस हटवण्यासाठी रासायनिक फवारणी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी यमुनेच्या किनाऱ्यावर अनेक चौक्या तयार करण्यात आल्या असून यांत्रिक बोटी व पाणबुड्यांच्या सहाय्याने हे काम करण्यात येत आहे.
दिवाळीनंतर यमुनेच्या तिरावर छट पूजा केली जाते. त्या दिवशी उपवास करुन यमुनेत स्नान केले जाते. भगवान श्रीकृष्णाची षोडषोपचार पूजा केली जाते. यमुना अष्टकाचे पठण करुन यमुनेची आरती करून उपवास सोडला जातो. मात्र यमुनेत सोडण्यात आलेले सांडपाणी व औदयोगिक रसायनांमुळे यमुना नदीत मोठ्या प्रमाणावर फेस आला आहे. यमुनेच्या पाण्यातील प्रदूषण वाढले असून छट पूजेच्या आधी यमुना स्वच्छ करणार असल्याचे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सांगितले आहे. यंदाची छट पूजा ६ किंवा ७ नोव्हेंबरला होणार आहे. त्या आधीच यमुनेतील सर्व फेस हटवला जाणार असून नागरिकांना यमुनेत बिनदिक्कत स्नान करता येईल असेही त्या म्हणाल्या.
SL/ML/SL
2 Nov. 2024