महागाईचा कहर, गॅस सिलिंडेरच्या किंमतीत प्रचंड वाढ
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती गगनाला भिडत असताना आता घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर ही प्रचंड भाववाढ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
आज म्हणजेच 1 मार्चपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. आता याची किंमत 1103 रुपयांवर गेली आहे. तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर आता 2119.50 रुपयांना मिळेल.
गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत एकूण ५ वेळा बदल झाला आहे.
22 मार्च 2022 रोजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढल्यानंतर दिल्लीत 899.50 रुपयांवरून 949.50 रुपयांवर पोहोचली होती.
यानंतर, तेल विपणन कंपन्यांनी 7 मे 2022 रोजी किंमत 50 रुपयांनी वाढवली, ज्यामुळे ती 999.50 रुपयांवर पोहोचली. त्याच महिन्यात 19 मे रोजी पुन्हा 2.50 रुपयांनी वाढ करण्यात आली. यानंतर किंमत 1003 रुपये झाली.
6 जुलै 2022 रोजीही सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर किंमत 1053 रुपये झाली होती. आता पुन्हा एकदा 50 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, त्यामुळे सिलिंडरची किंमत 1103 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात किंमत 203.50 रुपयांनी वाढली आहे.
SL/KA/SL
1 March 2023