पंतप्रधानांच्या हस्ते होणार जगातल्या पहिल्या वैदिक घड्याळाचे उद्घाटन
उज्जैन, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या प्राचिन वैदिक ज्ञानाचे आणि परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सध्या देशात विविध स्तरांवर प्रयत्न होत आहेत. आधुनिक विज्ञानाच्या तोडीस तोड असलेले वेदकालिन ज्ञान जगासमोर आणण्याच्या उपक्रमांना केंद्र सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जाते. उज्जैन येथे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील पहिल्या वैदिक घड्याळाचे अनावरण होणार आहे. भारतीय पंचांगावर आधारित या वैदिक घड्याळाचे दूरदर्शी प्रणालीने उद्घाटन होणार आहे. हे जगातील पहिले वैदिक घड्याळ आहे. वेळेची गणना करण्याची भारतीय पद्धत सर्वात पुरातन, सुक्ष्म, शुद्ध, निर्दोष, प्रामाणिक आणि विश्वसनीय पद्धत आहे. या पद्धतीचे घड्याळ उज्जैन येथे पुनर्स्थापित करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील जंतरमंतर येथे तब्बल 85 फूटाच्या टॉवरवर असलेल्या जगातील पहिल्या वैदिक घड्याळाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते होणार आहे.
सरकारी जिवाजी ऑब्सर्व्हटोरीजवळ असलेल्या वैदिक घड्याळात हिंदु पंचागानुसार माहीती मिळणार आहे.हे वैदिक घड्याळ सूर्योदय आणि सूर्यास्त दरम्यानचा वेळ 30 भागांमध्ये विभाजित करेल, प्रत्येक तासात IST नुसार 48 मिनिटे असतील. कालगणना 0:00 वाजता सूर्योदयापासून सुरू होईल, प्रत्येक 30 तासांच्या चक्राची सुरूवात होईल असे शिशिर गुप्ता यांनी सांगितले. उज्जैन शहराची भौगोलिक स्थिती कर्कवृत्तातून येत असल्याने योग्य वेळ समजण्यासाठी हे शहर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. तीनशे वर्षांपूर्वी उज्जैन येथे कालगणना मशिन देखील होती.
जगभरात उज्जैन येथील निर्धारीत आणि प्रसारीत वेळेचे पालन हिंदु धर्मिय पंचागासाठी करीत असतात. भारतीय खगोलीय सिद्धांत आणि ग्रह नक्षत्रांच्या गती आधारावर भारतीय वेळेच्या गणनेत वेळेचा सर्वात सुक्ष्म अंश देखील सामील केला जात असतो. या घड्याळात संवत, महिना, ग्रहांची स्थिती, चंद्राची स्थिती, शुभ मुहुर्त, घटीका, नक्षत्र, सुर्य ग्रहण, चंद्रग्रहणाची स्थिती कळते. वैदिक घड्याळामुळे वेळेची गणना करण्याच्या प्राचीन भारतीय परंपरेला पुन्हा उजाळा देण्यात येणार आहे. ग्रहांची स्थिती, मुहुर्ताची माहीती, खगोलशास्रीय गणना आणि ज्योतिष, तिथी ( चंद्र दिवस ) ही माहिती देखील या घड्याळाद्वारे मिळणार आहे.
ML/KA/SL
29 Feb. 2024