वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये झाली लातूरच्या नोटबुक चित्राकृतीची नोंद

लातूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहरातल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर पार्कवर ११ हजार चौरस फूट जागेवर बाबासाहेबांचे भव्यदिव्य चित्र नोटबुक्स म्हणजे वह्यांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे . ही चित्राकृती साकारताना साधारण १८ हजार नोटबुक्सचा वापर करण्यात आला आहे. ११ हजार चौरस फूट जागेवर नोटबुक्सने उभारण्यात आलेली ही देशातील पहिलीच चित्राकृती आहे. त्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने देखील या चित्राची नोंद घेतली आहे. खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून हे चित्र साकारण्यात आले आहे , त्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने त्यांच्या नावाचीही नोंद घेत विक्रम स्थापित केल्याचे प्रमाणपत्र दिले आहे . आर्टिस्ट चेतन राऊत आणि त्यांच्या इतर १८ कलाकारांनी मिळून हे चित्र तीन दिवसात साकारले आहे . ११,१२ आणि १३ एप्रिल रोजी हे चित्र लातूरकरांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. ११ हजार चौरस फुट जागेवर साकारण्यात आलेल्या या चित्राकृतीचे उदघाटन अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी अजित पाटील कव्हेकर ,शंकर शृंगारे , रागिणी यादव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे मुख्य संपादक पवन सोलंकी यांनी या चित्राची विक्रमी नोंद झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे .
नोट्बुकच्या माध्यमातून मोझ्याक पद्धतीने साकारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील हे पहिलेच चित्र आहे. ११ हजार चौरस फूट जागेवर रंगीत नोटबुक्स वापरून हे चित्र साकारण्यात आले आहे. हे चित्र पाहता यावे किंवा या चित्रा सोबत सेल्फी घेता यावी, यासाठी मोठा उंच रॅम्पही या ठिकाणी उभारण्यात आला आहे . एका वेळी दहा लोक सेल्फी घेऊ शकतील असा हा रॅम्प आहे.
ML/KA/PGB 12 APR 2023