पहिली व्हिझकिड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा पुण्यात उत्साहात पार पडली
 
					
    पुणे, दि ३१- पहिली व्हिझकिड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पुण्यातील बी.एम.सी.सी. कॉलेज येथील टाटा हॉलमध्ये यशस्वीरीत्या संपन्न झाली. ही स्पर्धा बाकलीवाल ट्युटोरियल्स आणि किंग्स इंडियन चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रभरातील तरुण खेळाडूंनी बुद्धिमत्ता, रणनीती उत्साह आणि ऊर्जेचा सुंदर संगम या स्पर्धेत दिसून आला आहे.
एकूण ३१० खेळाडूंनी तीन गटांमध्ये १६, १४ आणि १२ वर्षे वयोगटाखालील असणाऱ्या खेळाडूंनी आपले कौशल्य आणि स्पर्धात्मकता प्रदर्शित केली. सात फेऱ्यांच्या या रॅपिड फॉरमॅटमध्ये प्रत्येक खेळाडूस १५ मिनिटे + प्रत्येक चालीनंतर १० सेकंदांची वाढ असा वेळ दिला गेला होता, जेणेकरून खेळाडूंनी झपाट्याने विचार करून आपली रणनीतीक कौशल्याची मांडणी करून आपले कौशल्य दाखविले पाहिजे.
या स्पर्धेचे उद्घाटन फिडे मास्टर गौरव बाकलीवाल यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी खेळाडूंना संबोधित करताना सांगितले कि, खेळाडूवृत्ती, चिकाटी आणि निश्चय या तीन महत्वाच्या भूमिका चेस खेळताना खेळाडूंनी आत्मसात करायला पाहिजे तरच ते खेळाडू बुद्धिबळ सारख्या स्पर्धेत आपला ठसा उमटवू शकतात.
यानंतर बाकलीवाल ट्युटोरियल्सचे संस्थापक वैभव बाकलीवाल यांनी आंतरराष्ट्रीय चेस मास्टर अक्षय बोरगावकर (सध्या बी. टी. चा इयत्ता ११ वी चा विद्यार्थी) याच्याशी रोचक संवाद साधला. या चर्चेत त्यांनी बुद्धिबळ आणि शैक्षणिक क्षेत्रातील परस्पर संबंध मांडले आणि बुद्धिबळामुळे विकसित होणारी विश्लेषणात्मक विचारसरणी, संयम व समस्यासोपीकरण कौशल्ये ही शैक्षणिक उत्कृष्टता तसेच २१व्या शतकातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील यशासाठी कशी उपयुक्त ठरतात, हे अधोरेखित केले.
तसेच, त्यांनी सहभागी खेळाडूंना काही आकर्षक बुद्धिबळ आणि तर्कशास्त्रावर आधारित कोडी व प्रश्न विचारले, ज्यांचा प्रेक्षकांनीही मोठ्या उत्साहाने आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला पालक, प्रशिक्षक आणि बुद्धिबळप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा उपक्रम पुण्यातील तरुण बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. आयोजकांनी सर्व खेळाडू, पालक, स्वयंसेवक आणि अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि ही स्पर्धा दरवर्षी साजरी करून येणाऱ्या नवीन तरुण पिढीच्या बुद्धिमत्ता आणि रणनीतिक उत्कृष्टतेची परंपरा म्हणून पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
विजेते खालील प्रमाणे
16 वर्षाखालील गट (या गटातील सर्व विजेते बाकलीवाल टिटोरिअलचे विद्यार्थी आहेत)
- विहान दावडा (FIDE रेटिंग – 1871, गुण 6.5/7)
- ओजस देवशतवार (FIDE रेटिंग – 1778, गुण 6/7)
- CM अर्णव कदम (FIDE रेटिंग – 1867, गुण 6/7)
14 वर्षाखालील गट
- लाथिक राम (FIDE रेटिंग – 1896, गुण 6/7)
- भुवन कोंनूर (FIDE रेटिंग – 1545, गुण 6/7)
- AFM इशान कदम (FIDE रेटिंग – 1520, गुण 6/7)
12 वर्षाखालील गट
- अविरत चौहान (FIDE रेटिंग – 2071, गुण 7/7)
- शितिज प्रसाद (FIDE रेटिंग – 1783, गुण 6/7)
- कविन मथियाझगन (FIDE रेटिंग – 1533, गुण 6/7). KK/ML/MS
 
                             
                                     
                                    