मुंबई शहराच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी
मुंबई, दि. 14(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई तुंबणार नाही असा दावा महायुती सरकारने यावेळीही केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नालेसफाईची पाहणी केली होती पण पहिल्याच पावसाने सरकारचा दावा खोटा ठरवला. आजही अनेक झोपड पट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते. जी अवस्था नालेसफाईची तीच रस्त्यावरील खड्ड्यांची आहे. मुंबईतील रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही असा दावा सरकारने केला पण मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. फक्त कंत्राटदारांचे खिसे भरून मलई खाण्यात महायुती सरकार व्यस्त असून सर्वसामान्य मुंबईकरांचे महायुती सरकारला काहीही देणेघेणे नाही, असा प्रहार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
मुंबईकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई न्याय यात्रा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जात आहे. बुधवारी ही न्याय यात्रा सायन कोळीवाडा मतदारसंघातून निघाली.
सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातही समस्यांचा डोंगर पहायला मिळाला, या भागात महानगरपालिकेचे सायन हॉस्पिटल आहे पण हॉस्पिटलमध्ये पुरेसे बेड्स उपलब्ध नाहीत, एकाच बेडवर दोन रुग्णांवर उपचार करावे लागतात अशी परिस्थिती आहे. नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याने झोपडपट्टीत पाणी शिरते तर पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण फिरावे लागते. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. बेस्ट सेवा डबघाईला आली आहे, रस्त्यावरच बस बंद पडतात तर काही वेळेस बस येतही नाहीत. रेशनवर धान्यही मिळत नाही. नालेसफाई व्यवस्थित झालेली नसल्याने झोपडपट्टीत भागात पाणी तुंबते. शौचालये व ड्रेनेज सिस्टिम नसल्याने सेफ्टी टँकमधील घाण गटारात सोडली जाते ज्यातून दुर्गंधी पसरते. या भागातील लोक सोयीसुविधापासून आजही वंचित आहेत. मुंबई महापालिकेतील पैसा सर्वसामान्य मुंबईकरांच्या विकासासाठी खर्च केला जात नाही तर सुशोभिकरणाच्या नावाखाली उधळपट्टी केली जाते, असे प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.
आजच्या न्याय यात्रेत खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसिम खान, आमदार भाई जगताप, चरण सपरा, रवी राजा, मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश यादव, महासचिव संदीप शुक्ला, तुषार गायकवाड, जिल्हा अध्यक्ष हुकुमराज मेहता, कचरू यादव, ललिता यादव, सुफियान वणु, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, रमेश कांबळे, नवीन शिलववंत, अमित शेट्टी व ईतर नेते आणि पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
SW/ML/SL
14 August 2024