हिंसाचार करणाऱ्यांच्या रुग्णांना आता नाकारले जातील उपचार

 हिंसाचार करणाऱ्यांच्या रुग्णांना आता नाकारले जातील उपचार

मुंबई,दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना एकेकाळी देव मानले जात असे. परंतु आता काही कारणास्तव उपचारा दरम्यान रुग्ण दगावल्यास किंवा मनाजोगते उपचार न झाल्यास रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण केल्याच्या बऱ्याच घटना आढळून येतात. मात्र आता आतताई वृत्तीला लगाम बसणार आहे. कारण आता अशाप्रकारे ड़ॉंक्टरांशी हिंसक वागणाऱ्या, गैरवर्तन करणाऱ्यांना उपचार नाकारण्याचा अधिकार डॉक्टरांना मिळणार आहे.

डॉक्टरांवरील हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत असे म्हटले होते की, नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी (RMPs) डॉक्टरांशी गैरवर्तन, मारहाण आणि हिंसाचार करणाऱ्या रुग्णांना किंवा नातेवाईकांना उपचार करण्यास नकार देऊ शकतात.

आरएमपीला जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, रुग्णांच्या असभ्य वर्तनाविरोधात डॉक्टर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे तक्रार करू शकतात, जेणेकरून रुग्णाला उपचारासाठी इतरत्र पाठवले जाईल. हे नियम मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) च्या मेडिकल एथिक्स कोड 2002 ची जागा घेतील. अशा रुग्णांना उपचार नाकारण्याचा अधिकार डॉक्टरांना प्रथमच मिळणार आहे.

आरएमपी अधिसूचनेमध्ये असे नमूद केले आहे की आपत्कालीन परिस्थिती वगळता, कोणत्या रुग्णावर उपचार करायचे हे डॉक्टर स्वतंत्रपणे ठरवू शकतात. आरएमपीची रुग्णांप्रती जबाबदारी आहे तसेच त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे.

रुग्णांच्या उपचाराशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही सांगावी आणि विनाकारण केस पाहण्यापासून दूर ठेवू नये. रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांना सल्ला शुल्काची माहिती द्यावी लागेल. रुग्णांवर शस्त्रक्रिया करावयाची असल्यास त्यात होणारा खर्चही सांगावा लागेल.

दरम्यान राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या अधिसूचनेमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांनी औषध कंपन्यांकडून कोणतीही भेटवस्तू, प्रवास सुविधा, सल्ला शुल्क किंवा मनोरंजन स्वीकारणे टाळावे. RMP ने सेमिनार, कार्यशाळा, परिसंवाद, फार्मास्युटिकल कंपन्यांची परिषद किंवा त्यांच्याशी संबंधित आरोग्य सेवांपासून दूर राहावे.
SL/KA/SL
11 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *