समान नागरी कायद्यामुळे कुणालाही धोका नाही
ठाणे, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समान नागरी कायद्यामुळे कुणालाही धोका वाटण्याचे कारण नाही. याउलट आपण सर्वानीच या कायद्याला समर्थन देण्याची गरज आहे. असा ठाम विश्वास केरळचे राज्यपाल आणि ज्येष्ठ अभ्यासक , विचारवंत आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने ठाण्यात शुक्रवारी आयोजित केलेल्या समान नागरी कायदा कशासाठी आणि कसा? या विषयावरील व्याख्यानात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी विचार व्यक्त केले.
देशभरात चर्चेत असलेल्या समान नागरी कायदा या विषयाबद्दलचे सखोल मंथन घडावे , या कायद्याबद्दलची सर्वांगीण समज आणि नेमकी जाणीव निर्माण व्हावी. यासाठी हे व्याख्यान योजण्यात आले होते.याप्रसंगी, व्यासपीठावर सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी, प्रबोधिनीचे कार्यकारी समिती सदस्य सुजय पतकी आणि अरविंद रेगे उपस्थित होते. तर श्रोत्यांमध्ये आ. निरंजन डावखरे, माजी खा.संजीव नाईक, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी आ. डावखरे यांनी राज्यपालांना शिवछत्रपतींची प्रतिमा भेट दिली.
भारताची परंपरा ४ हजार वर्षांपेक्षाही जुनी आहे.तेव्हा, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेत जगात अव्वल असलेल्या भारतामध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे, हा उद्देश स्पष्ट करून राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी, समरसता हवी समरुष्टता नको, समरसतेतून एकता अबाधित राखता येईल. हे सोदाहरण स्पष्ट करताना भगवदगीता तसेच स्वामी विवेकानंद यांचे विचार श्रोत्यांसमोर उलगडले. पुढे बोलताना त्यांनी,६०० वर्षापूर्वी इस्लामी राजांना कधी वाटले नाही. पण इस्लामसाठी इंग्रजांनी पर्सनल लॉ लागू केला. इतरांसाठी हिंदू कोड बील बनले.
आता ७५ वर्षाचा सुवर्णकाल संपून १४ ऑगस्ट पासून अमृतकाल सुरु होत आहे. याच अमृतकालात समान नागरी कायदा लागू होणे गरजेचे आहे.समान नागरी कायद्याचा उद्देश समान न्याय उपलब्ध करणे हा आहे. तरी, समान नागरी कायदा आला तर मनुस्मृती लागू होईल असा अपप्रचार केला जातो. समान नागरी कायद्याचा उद्देशच निव्वळ समानता आहे.तेव्हा खरी गरज आहे ती याबाबत भ्रम पसरवणाऱ्या प्रवृतीना रोखण्याची. असेही आरिफ खान यांनी स्पष्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.
व्याख्यानाच्या प्रारंभी म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी यांनी, समान नागरी कायद्यासाठी ७५ वर्षाचा काळ उलटून जावा लागल्याची खंत व्यक्त करून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सकारात्मक प्रबोधनाच्या कार्याचा उहापोह केला. तर विनय सहस्त्रबुद्धे यांनी, राजकारण केवळ सत्तेसाठी नसते ही ब्रीद जपणारे प्रसंगी पदालाही लाथ मारणारे असे वक्ते आज लाभल्याचे सांगून राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचा परिचय करून दिला. तर सूत्रसंचालन सुजय पतकी यांनी केले.
ML/KA/SL
12 Aug 2023