पत्रकारांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ ११ पत्रकार संघटनांचे तीव्र आंदोलन

 पत्रकारांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ ११ पत्रकार संघटनांचे तीव्र आंदोलन


मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच या हल्ल्याला चिथावणी देणारे पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी व इतर मागण्यांसाठी ११ पत्रकार संघटनांनी आज मुंबईत तीव्र आंदोलन केले.

आंदोलनापूर्वी हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार संघटनांच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनवर नेऊन समज देऊन सोडण्यात आले. यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आवारात पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची होळी करण्यात आली.
या आंदोलनात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघ, मुंबई प्रेस क्लब, बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट, क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन, मुंबई म्हाडा पत्रकार संघ, पोलिटिकल फोटो जर्नालिस्ट असोसिएशन, महापालिका पत्रकार संघ आणि उपनगर पत्रकार संघटना या संघटना सहभागी झाल्या होत्या.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात त्यानंतर झालेल्या सभेत पत्रकारांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मराठी पत्रकार परिषदेचे व पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे अध्यक्ष श्री. एस. एम. देशमुख यांनी महाजन यांनी दिलेल्या बातमीची व त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. देशमुख म्हणाले की, पत्रकार हल्लाविरोधी कायदा हा सक्षम आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नाही, हे दुर्दैव आहे. गेल्या तीन वर्षांत पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांपैकी केवळ १५ टक्के हल्लेखोरांना या कायद्यांतर्गत शिक्षा झाली. यावरून या कायद्यांसंदर्भात पोलिसांची उदासीनता दिसून येते.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे म्हणाले की, पत्रकारांवरील हल्ले वाढत आहेत, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकारांचे मित्र आहेत, असे आम्ही मानतो. त्यांनी महाजन यांच्यावर हल्ला करणारे आपल्या पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. पण तसे झालेले नाही. म्हणूनच ११ पत्रकार संघटनांना आज आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले आहे. पत्रकारांवर हल्ले झाल्याने पत्रकार घाबरणार नाहीत. ते अधिक जोमाने हल्लेखोरांविरुद्ध लिहितील. याची किंमत संबंधितांना मोजावी लागेल, असेही वाबळे म्हणाले.

मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंग म्हणाले की, देशभर पत्रकारांवर हल्ले होत आहेत. प्रेस कौन्सिलपुढे अशा हल्ल्यांची महिन्याला किमान ५० प्रकरणे येतात. उत्तर प्रदेशात पत्रकार परिषदेत आमदाराला अडचणीचे प्रश्न विचारले म्हणून पत्रकाराला अटक झाल्याचे उदाहरण आहे. हे सारे संतापजनक आहे. प्रेस कौन्सिलची एक सत्यशोधन समिती लवकरच मुंबईत येणार असून संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याची व कोकणातील पत्रकार वारीशे यांच्या हत्येची चौकशी करून आपला अहवाल पुढील कारवाईसाठी प्रेस कौन्सिलला सादर करणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह
संदीप चव्हाण म्हणाले की, पत्रकारांवरील हल्ल्यांसंदर्भातील पत्रकारांची ही लढाई या राज्यव्यापी आंदोलनाने आज खर्‍या अर्थाने सुरू झालेली आहे. शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आजचे हे आंदोलन आहे. पण या आंदोलनानंतरही जर काही कारवाई झाली नाही तर सर्व पत्रकार संघटना न्यायालयात जाऊन दाद मागतील. Violent agitation by 11 journalist organizations to protest attacks on journalists

ML/KA/PGB
17 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *